वसंत भोईर,वाडा
भाताचे पैसे दोन महिने रखडले ; शेतकरी आंदोलन छेडणार,
वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये महामंडळाविरुद्ध प्रचंड संताप आहे.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.यात गो-हे, पोशेरी,कोनसई,परळी, सारशी,खैरे- आंबिवली, मानिवली,गुहिर या आठ केंद्रांचा समावेश आहे.यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाणी केली आहे.अशा शेतकऱ्यांचे भात खरेदी-विक्री केंद्रावर घेण्यात आले आहे.ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत,त्यांचे भात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केंद्रचालकांनी केली, शिवाय भात विक्री होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे तरी भात विक्रीचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत.त्यासाठी शेतकरी वारंवार फेऱ्या मारत आहेत.महामंडळाच्या अशा अनागोंदी कारभारा विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रु. अडकल्याने येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.सेवा सहकारी सोसाट्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी शिवाय मुलाबालांची लग्न येऊ घातली आहेत ती करणार तरी कशी ? असा मोठा आर्थिक पेच त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.केंद्र चालकांकडे या संदर्भात चौकशी केली असता. काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. कागदपत्रांची खातरजमा करून घेतली असताना तांत्रिक अडचण तरी कोणती ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.महामंडळाच्या अशा अनागोदी कारभारामुळे बळीराजा मात्र मेटाकुटीला आला आहे.लवकरात लवकर शेतकऱ्यांना भात विक्रीचे पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील,असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.तर आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

