जव्हार प्रतिनिधी
युवकांनो संकटातून बाहेर कसे पडावे,याची प्रेरणा छत्रपती शिवरायांकडुन घ्यावी- शिवव्याख्याते नितिन आहेर,
संकटातून कमबॅक कसे करावे,संकटातून उभारी कशी घ्यावी,हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावे,असे प्रतिपादन शिवव्याख्याता नितीन आहेर यांनी केले.
आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले,पुरंदरच्या तहात शिवरायांना ९० टक्के स्वराज्य मुघलांना द्यावा लागला.२३ वर्षात शिवरायांनी ३५ किल्ले जिंकले होते आणि पाच लक्ष होन वसुलीचा प्रदेश स्वराज्यात जिंकला होता. त्यापैकी २३ किल्ले व चार लक्ष होन वसुलीचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. त्यामुळे शिवरायांकडे फक्त १२ किल्ले व एक लक्ष होन वसुलीचा प्रदेश शिल्लक होता.परंतु या भयंकर संकटाला न डगमगता संयम,शिस्त, आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी,
अविश्रांत मेहनत याच्या जोरावर १६८० पर्यंत स्वराज्यात आणखी ३४८ किल्ले जोडले,त्यामुळे महाराजांच्या मृत्यूच्या वेळी स्वराज्यात ३६० किल्ले होते.ही बाब इतकी गौरवास्पद आहे की,पुरंदर तहानंतर छत्रपती शिवरायांनी त्याकाळचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.पन्हाळगडाचा वेढा असो,अफजलखान प्रकरण असो,नाहीतर आग्र्याहुन सुटका,अशा प्रत्येक प्रसंगात शिवाजी महाराजांनी न डगमगता बुद्धीच्या चातुर्याच्या जोरावर संकटावर मात केली. हा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवून संकटातून उभारी कशी घ्यावी,हे शिकावे व खोडाळ्यातील स्वराज्य मित्र मंडळाला सुद्धा तेच अपेक्षित आहे की,तरुणांनी प्रेरणा घेत आपले आयुष्य घडवावे.स्वराज्यात सामान्य रयत सुखी व्हावी,आया बहिणींना सन्मानाने जगता यावं,यासाठी शिवरायांनी अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात रयतेच्या अन्न, वस्त्र,निवारा या जीवनावश्यक गरजा सन्मानाने पूर्ण होत असत.स्त्रियांना आत्मसन्मानाने जगता येई,कुणावरही अन्याय किंवा जुलुम होत नव्हता,स्वराज्यात शेती व व्यापार उदीमाची भरभराट होती.शिवरायांनी दुष्काळात शेतसारा माफ केला होता,शेतक-यांना बिनव्याजी कर्ज दिले होते,शिवरायांनी पडीक जमिनी शेतक-याला कसायला दिल्या,लागवडीसाठी सर्व प्रकारची मदत केली.त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले व सर्वांच्या घरात सुख-समृद्धी आली.
खोडाळ्यातील स्वराज्य मित्रमंडळचा आदर्श घेत शिवजयंतीला इतर मित्र मंडळांनी शिव-व्याख्यान जागोजागी आयोजित करुन हा वैभवशाली,गौरवशाली इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचवावा,असे आवाहन शिवव्याख्याते नितिन आहेर यांनी केले.आहेर हे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक तर आहेतच,परंतु व्याख्याते म्हणूनही ते सुप्रसिद्ध आहे
स्वराज्य मित्रमंडळ खोडाला हे गेल्या चार वर्षापासून शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करत आहे. यावेळी ढोलताशांच्या गजरात गावातुन शोभायात्रा काढत भव्य मिरवणुक काढण्यात आली व एकंदरीत वातावरण शिवमय बनले होते.स्वराज्य मित्रमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात अठरा पगड जातीचे युवक असुन ते शिवजयंती साजरी करत आहे.
यावेळी माजी उपसभापती प्रदिप वाघ व जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी मिलिंद झोले यांनी स्वराज्य मंडळाचे कौतुक करत मंडळाला शुभेच्छा दिल्या व शिवविचार मांडले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले,खोडाळा उपसरपंच येलमामे,ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम,सुप्रसिद्ध डॉ. मिठाराम कडव व खोडाळावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

