अनंत भोईर,पालघर
एकही कुटुंब निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री नाईक,
मानवी जीवनाची सुरुवात झाल्यापासून माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहेत.या गरजांचा एक भाग म्हणून निवारा आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही,असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ च्या २० लाख लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वितरण व १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम,आज जननायक बिरसा मुंडा सभागृह,जिल्हा परिषद पालघर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास खा.हेमंत सवरा,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भानुदास पालवे, उपायुक्त ( विकास ) कोकण विभाग प्रदिप घोरपडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ च्या २० लाख लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे अभासी प्रणालीद्वारे बालेवाडी जि.पुणे येथे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.तसेच पालघर जिल्हयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे व प्रथम हप्ताचे वितरण करण्यात आले.पालघर जिल्हयात सन २०२४-२५ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ च्या एकूण ५९ हजार ५३५ रु. चे मंजूरीपत्र व २५ हजार ८९० रु.च्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की,पालघर जिल्हयाने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे.पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जोपर्यंत सर्व घटकांना शिक्षण मिळत नाही,तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यासाठी आदिवासी बांधवांनी प्रथम शिक्षण घेतले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
नाईक पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होत आहे.या बंदरामुळे जिल्हयातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबणार असून त्यांना या ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे राबवण्यात यावी. तसेच या योजनेपासून पालघर जिल्हयातील एकही घटक घरापासून वंचित राहणार नाही,अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ च्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

