सुरेश वैद्य,सफाळे,
बोईसर,सफाळे,केळवे-माहीम,नगरपंचायती होणे,ही काळाची गरज,
सफाळे,केळवे-माहीम व बोईसर,या तीन ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणाला आलेला वेग व ग्रामपंचायतीची आर्थिक कुवत लक्षात घेऊन या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये व्हावे,अशी मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी एका एनजीओचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री/नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
वरील तिन्ही गावातील लोकसंख्या सतत वाढत असून बोईसरची लोकसंख्या ही जवळपास एक लाखाच्या घरात पोहोचली आहे.येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध होणारा रोजगार लक्षात घेता,या परिसरात भविष्यात लोकसंख्येला अधिक वेग येण्याची
शक्यता आहे.वास्तविक शहराचा वाढता पसारा लक्षात घेऊन राज्य
सरकारने येथे यापूर्वीच नगरपरिषद स्थापन करायला हवी होती.पण राजकीय व उद्योजकांची लॉबी यांच्या दबावामुळे राज्य शासन याविषयी निर्णय घेण्यास तयार नाही.परिणामी बोईसरवासियाना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पाणी,आरोग्य,
वैद्यकीय सेवा व स्वच्छता इ.नागरी सुविधांचा पार बोजवारा उडाला आहे.केळवे-माहीम व सफाळे या दोन गावातही लोकसंख्येला चांगलाच वेग आला आहे.पालघर शहरात सदनिकांचे भाव सतत वाढत असल्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरून येणारे नागरिक हळूहळू केळवे-माहीम व सफाळे परिसरात सरकू लागले आहेत.माहीम ग्रामपंचायत हद्दीतील सुंदरम भागात बांधकाम व्यवसायाला प्रचंड वेग आला आहे.दिवसागणिक नागरी संकुले उभ्या राहत आहेत.या निवासी संकुलात राहायला आलेल्या नागरिकांना सध्या विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.बिल्डर लॉबी रस्ते,सांडपाणी निचरा व अन्य नागरी सुविधा त्यांना उपलब्ध करत नाहीत,तर ग्रामपंचायतींना या बिल्डरांच्या मनमानी कारभाराला वेसण घालणे शक्य होत नाही.त्यामुळे येथील नागरिकांची अवस्था सध्या ” आगीतून फुफाट्यात,” अशी झाली आहे.सफाळे भागाच्या पूर्व भागात यापूर्वीच शेकडो बांधकामे उभी राहिली आहेत,आता हे लोण गावाच्या पूर्व भागात पसरत चालले आहे.परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी महायुती सरकारने या तिन्ही ठिकाणी नगरपंचायती निर्माण करण्याच्या हालचाली सुरू करणे,आवश्यक आहे.या प्रकरणी एका एनजीओचे शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री/ नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

