दीपक मोहिते,
विकास करताना स्थानिकांचा आधी विचार झाला पाहिजे-निवृत्त न्या.गोखले,
कुठल्याही प्रदेशात विकास करताना स्थानिक जनता,संस्कृती आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार केला पाहिजे.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे सुराज्य स्थापन करताना आधी रयतेच्या अशा हिताचा विचार केला होता.अशाप्रकारचे सुराज्य स्थापन करण्यासाठी जी निवडक मंडळी धडपडत आहेत,त्यापैकी मनवेल तुस्कानो एक आहेत.
जनहिताचे प्रश्न बाजूला सारून कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहण्यासाठी सत्तांतर,पक्षफोडी अशा कुरापतींना प्राधान्य देण्याची पद्धत रूढ होत असताना तत्त्वासाठी लढणारे माणूसप्रेमी व साधे सरळ आयुष्य जगणारी माणसं आता दुरापास्त होत आहेत.
विरार पश्चिमेस नंदाखाल गावी काल संपन्न झालेल्या मनवेल तुस्कानो अमृतमहोत्सवी गौरव सोहळा समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सभेला संबोधित करताना अँड.नीता कर्णिक म्हणाल्या की आजोबा यदुनाथ थत्ते यांच्या समाजवादी संस्कारांने मला वकिली पेशाकडे जाणिव व जबाबदारीने पाहण्यास शिकवले.सत्तेत राहून खिसा भरण्याची नाही संधी आली असता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन एखाद्या बिल्डरला ग्रामपंचायतीची घरपट्टी भरायला लावणारे सरपंच मनवेल तुस्कानो खरोखरच ग्रेट आहेत.नागरिकांच्या हितासाठी विरोधातील राजकीय शक्ती विरूद्ध लढणारे ते निडर असे लीडर आहेत.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना वसई धर्मप्रांताचे बिशप थाॅमस डिसोजा म्हणाले,की प्रत्येक राजकीय पुढारी आध्यात्मिक असावा,कारण विचारांचे देखील अध्यात्म असते.अध्यात्म माणसाला सतत पुढे नेत असते.मनवेल तुस्कानो आधी स्वतः आध्यात्मिक आहेत,मग ते राजकीय व्यक्तीमत्व आहेत. म्हणूनच त्यांना जनसामान्यांची संवेदना कळते.निर्भय जनमंच मधील त्यांचे लेखन संघर्षामधून प्रसवल्यामुळे ते खरे साहित्य आहे.डोळ्यात अंजन घालणारे आहे.चिंतन करायला लावणारे आहे.त्यांच्या प्रखर विचारांचा ओसंडणारा हा धबधबा कुंठीत होऊ न देणे,हीच खरी मनवेल साहेबांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाची शुभेच्छा ठरेल.त्यांचा लढा अजून संपलेला नाही तो पुढे नेऊन यशस्वी होत असल्याचे दाखवून देणे,हीच त्यांच्यासाठी दिर्घायुष्याची भेट असू शकते.
सदर कार्यक्रमावेळी मनवेल तुस्कानो यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ” यज्ञ व समिधा, ” हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.तसेच त्यांच्या झुंजार पत्रकारिता व समग्र सार्वजनिक चळवळींवर आधारित सादर केलेला माहितीपट लक्षवेधी ठरला.
हजारो चाहत्यांची उसळलेली उत्स्फूर्त गर्दी,सुरेख सुत्रसंचलन,महनीय वक्त्यांचे समायोजित भाषणे आणि स्वखर्चाने उभारलेले कार्यकर्त्यांचे यशस्वी आयोजन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

