वसंत भोईर,वाडा
ऑनलाइन पीक पाणी न झालेले शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करण्याची मागणी,
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते.यावेळी सुमारे विविध विभागांचे सातशे एकोणचाळीस तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडा तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदने सादर केली आहेत.आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते.यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे पीक पाहणी करण्यात आलेली नाही.अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने पिक पाहणी सातबारा उतारावर केली आहे.पण या शेतकऱ्यांची धान ( भात ) खरेदी शासनाकडून थांबवण्यात आले आहे.अशा ऑनलाइन पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांची भात खरेदी करण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे,त्या शेतकऱ्यांना मोबदला त्वरित मिळाव,अशी मागणी करणारे निवेदन जयेश शेलार यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना दिले आहे.तर भिवंडी – वाडा – मनोर या रस्त्याचे रखडलेले काम व काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक व सूचना असणारे फलक लावावेत व ज्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे अशा ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करावी व रस्त्यावरील खड्डे भरावेत,अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे. तसेच वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी कंपन्याची चौकशी करण्याची ही मागणी जयेश शेलार यांनी केली आहे.

