सुरेश वैद्य,सफाळे,
सफाळे गांव : पालकमंत्र्यांनी नियोजित विकास आराखडा तयार करावा,
पश्चिम रेल्वेवर असलेल्या सफाळे गांवात गेल्या काही वर्षात नागरिकरणाला प्रचंड वेग आला असून या गावाच्या लोकसंख्येचा वेलू आता गगनावर पोहोचला आहे. नागरिकरणाचा वेग लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने या गावातील नागरी समस्या वेगाने मार्गी लावण्याची गरज आहे.त्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.
वेगळा पालघर जिल्हा व उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर सफाळे ते डहाणू दरम्यान असलेल्या अनेक गावाची लोकसंख्या चढत्या कमानीवर आरुढ झाल्या.त्यामध्ये सफाळे या गावाचाही समावेश आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकाचे गांव,अशी जी ओळख या गावाची होती,ती हळूहळू पुसली गेली.तालुक्यातील अनेक गावांची वाटचाल शहराच्या दिशेने सुरु झाली.या सर्व बदलाच्या तुलनेत लोकांना नागरी सुविधा मात्र उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.सफाळे गावाच्या पूर्व भागात बांधकाम व्यवसायाला प्रचंड वेग आला व हां हां म्हणता अनेक नागरी संकुले उभी राहिली.आता हे लोण हळूहळू गावाच्या पश्चिम पट्ट्यातही पोहोचू लागले आहे.रस्ते,गटारे,पदपथ,कचरा निर्मूलन,साफसफाई,आरोग्य, वाहतूककोंडी,फेरीवाल्याचा सुळसुळाट,सार्वजनिक शौचालये,इ.विकासकामे करण्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे शक्य झाले नाही.त्यामुळे हे गांव बाळसं धरण्याऐवजी तीला सूज आली.वास्तविक लोकप्रतिनिधिनीही या सर्व प्रकरणी लक्ष घालून आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज होती.पण तसे काही घडले नाही.या गावाला बकाल स्वरूप येण्यापूर्वी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आमदार,खासदार,स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन गावाचा नियोजित विकास आराखडा तयार करावा व त्याच्या माध्यमातून या गावाचा सर्वांगीण विकास होणे शक्य होऊ शकेल,अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

