सुरेश काटे,तलासरी
तलासरीत पंतप्रधान आवास योजनेपासून लाभार्थी वंचित,
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देशात लाखो गोरगरिबांना घरे देण्याचा कार्यक्रम सुरू असताना, केवळ काही जाचक अटीमुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित आहेत.
तलासरी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकाही नागरिकाला मिळालेला नाही.त्यामुळे या योजनेच्या अटी आणि नियम शिथिल करण्यात यावेत,अशी मागणी नगरसेवक आणि भाजपाचे शहराध्यक्ष सुरेंद्र निकुंभ यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
निकुंभ यांनी यापूर्वी वारंवार याबाबत आवाज उठवला आहे.शासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे.परंतु, अद्याप त्यांच्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.तलासरी नगरपंचायतीमधील हद्दीत हजारो आदिवासी नागरिक राहतात.त्यांच्याकडं स्वतःच्या जमिनी नाहीत.ज्यांच्याकडे जमिनी आहेत,त्या वर्ग दोनच्या असल्यामुळे तेथेही निवासस्थान मिळत नाही. त्यामुळे या योजनेच्या अटी शिथिल करून वर्ग दोन जमिनी असतील किंवा कच्चं घर असूनही घरपट्टी असेल तर,अशा लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,त्यासाठी त्यातील अटी शिथिल करण्याची मागणी निकुंभ यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
नगरपंचायतची स्थापना झाल्यापासून या योजनेचा लाभ गरीब आदिवासी लाभार्थी यांना मिळालेला नाही.ज्यांची घरपट्टी आकारण्यात आली आहे,अशा कच्च्या घराचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा.तसेच आपण पंतप्रधान आवास योजनेतील अटी आणि नियमामुळं अनेक लोक या योजनेपासून वंचित राहात असल्याचं सरकारच्या निदर्शनास आणलं आहे.आता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित केला आहे.पालकमंत्री याबाबत निश्चित प्रयत्न करतील आणि काही नियम शिथिल करतील, असा विश्वास वाटतो”. – सुरेंद्र निकुंभ,नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष, तलासरी
