अनंत भोईर,पालघर
पालघर येथे भव्य ” जय शिवाजी जय भारत,” पदयात्रेतून शिवजयंती उत्साहात साजरी,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये भव्य ” जय शिवाजी जय भारत पदयात्रा,” काढण्यात आली.ही पदयात्रा तहसील कार्यालय,पालघर येथून जिल्हाधिकारी कार्यालय,पालघरपर्यंत निघालेल्या या भव्य पदयात्रेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,तहसीलदार सचिन भालेराव,शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) संगीता भागवत तसेच

अधिकारी,कर्मचारी, सामाजिक संस्था,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले.
या पदयात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जागर करण्यात आला.या पदयात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी महाराजांच्या वेशभूषेतून ऐतिहासिक दृश्ये उभी केली,तसेच आकर्षक नृत्य आणि लेझीम पथकाने उत्साह वाढवला.संपूर्ण पालघर शहर शिवमय झाले होते.
विशेष म्हणजे,इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच ही पदयात्रा काढण्यात आली,याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या प्रसंगी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व सहभागी नागरिकांसाठी डिजिटल सर्टिफिकेटची सोय केली होती.एक विशेष क्युआर कोड स्कॅन करून सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे. तसेच,सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते.ज्यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी लाईफ क्लब सफाई संघटनेच्या वॉलंटियर्स आणि लेझीम पथकाने मोलाची भूमिका बजावली.

