शुभम सावंत,विरार
महानगरपालिकातर्फे आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग,
” जय शिवाजी जय भारत, ” च्या जयघोषाने संपूर्ण वसई शहरात आज जल्लोषाचे वातावरण होते.निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे…

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी वसईतील हुतात्मा बाळा सावंत स्मारक ते नरवीर चिमाजी आप्पा स्मारक,वसई किल्ला या मार्गावर ” जय शिवाजी जय भारत,” या सुमारे साडेपाच कि.मी.पदयात्रेचे आयोजन केले होते.या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक,पदाधिकारी, विद्यार्थी,अधिकारी कर्मचारी,पोलिस विभाग व विविध कला सादर करणारे पथके सहभागी झाली होती.
वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित व आयुक्त अनिलकुमार पवार यांचे शुभहस्ते हुतात्मा बाळा सामंत यांच्या स्मारकास पुष्पचक्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.महाराजांच्या जयंती निमित्त ” एक पेड मा के नाम, ” या कार्यक्रमाच्या वतीने स्मारक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संपूर्ण पदयात्रा दरम्यान विविध पथकांच्या कला सादर करण्यांत आल्या.यामध्ये तुतारी,ढोलताशा,लेझीम, योगा,तारपा नृत्य, पोवाडा,मल्लखांब व पथनाट्ये देखील सादर करण्यात आली.
विविध चित्ररथ व ” जय शिवाजी,जय भारत,” अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सकाळी ९ः३० वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला येथे नेण्यात आली.
त्यानंतर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या वसई किल्यातील पुर्णाकृती पुतळ्याला वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित,प्रांत अधिकारी शेखर घाडगे,महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
रोजगार निर्मित या संकल्पनेतून समारोपाच्या प्रांगणात विविध बचत गटांचे वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात जावा, यासाठी इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली.
शहरातील साहित्यिक,युथ आयकॅान,कलाकार व खेळाडू यांचा देखील प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर एकपात्री अभिनय,दिव्यांग विद्यार्थ्यांचे नृत्य,तारपा नृत्य,देशभक्तीपर नृत्य,इतिहासावर आधारित नाट्य यांचे देखील सादरीकरण झाले.तसेच यावेळी महानगरपालिकेतर्फे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

