सुरेश वैद्य,सफाळे,
दातीवरे गाव ; पर्यटनाला चांगला वाव,रोजगाराच्या संधी निर्माण होतील,
पालघर तालुक्यात सफाळे गावाच्या पश्चिमेस समुद्रकिनारी वसलेले दातीवरे गाव,हा मच्छीमार गाव म्हणून ओळखला जातो.या गावाची लोकसंख्या जेमतेम अडीच हजाराच्या आसपास आहे.येथील स्थानिक रहिवासी हे मासेमारी व शेती,या पारंपारिक व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत असतात.पश्चिम रेल्वेने सफाळे रेल्वे स्थानक येथे उतरून एसटी किंवा रिक्षाने या गावात जाता येते.विशेष म्हणजे या गावाला अर्नाळा येथून बोटीनेही जाता येते.येथील समुद्रात माश्याच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात,येथील रहिवाश्यांचा प्रमुख हा व्यवसाय मासेमारी आहे.पण त्यातून होणारी आवक ही माफक प्रमाणात असल्यामुळे या परिसरात सरकारने पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत,अशी स्थानिकांची मागणी आहे.पण याविषयी सरकारकडून आजवर ठोस पावले उचलली गेली नाहीत.
निसर्गरम्य असा समुद्रकिनारा लाभलेल्या या ऐतिहासिक गावात पुरातन किल्लाही पाहायला मिळतो.हा परिसर वैतरणा नदीच्या खाडी पट्यात असून दरवर्षी येथे ठराविक काळात फ्लेमिंगो व अन्य दुर्मिळ पक्षाचे वास्तव असते.काही महिन्यांपूर्वी विरार चिखलडोंगरी येथून नवीन जलमार्ग सुरू करण्यात आला आहे.मुंबई पासून अवघ्या १०० की.मी.अंतरावर असलेल्या या गावात अवघ्या तीन तासात पोहोचणे सहज शक्य होते.वास्तविक भौगोलिक व निसर्गरम्य परिसर लक्षात घेता येथे पर्यटनाला भरपूर वाव आहे.मात्र राज्यशासनाचे पर्यटन
विभाग,त्याकडे आजवर दुर्लक्ष करत आले.जर हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून राज्यशासनाने विकसित केला तर स्थानिक भूमीपुत्रांच्या हाताला बऱ्यापैकी रोजगार मिळू शकतो.त्यासाठी गावातील काही तरुण एकत्र येऊन शासनस्तरावर प्रयत्न करणार आहेत.अर्नाळा,कळम्ब व केळवे,येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात,या भागात पर्यटनवाढीसाठी जर शासनाने प्रयत्न केले तर या भागाच्या विकासाला नक्की चालना मिळू शकेल,असे दातीवरेवासीयांचे म्हणणे आहे.

