वसंत भोईर,वाडा
वाड्याचा स्वप्नील पाटील राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम,
पलपब प्रकाशन संस्था अहमदाबाद,यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय काव्यलेखन वाचन स्पर्धा पालघर येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्वरचित काव्य सादरीकरणासाठी राज्यभरातून पन्नास कवी निवडण्यात आले होते.कवींना आवाहन करून त्यांच्या कविता मागवल्या होत्या. त्यामधून निवडलेल्या पन्नास कवींना स्पर्धेत कविता सादरीकरणाची संधी देण्यात आली.या काव्य स्पर्धेत वाडा तालुक्यातील चिखले येथील स्वप्नील पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जेष्ठ लेखक विनायकराव जाधव यांच्या हस्ते पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
स्वप्नील पाटील,हे शिक्षक असून प्रबोधनकरी व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या लेखन,अभिनय तथा व्याख्यानाच्या माध्यमातून ते मागील पंधरा वर्षांपासून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.स्पर्धेसाठी त्यांनी सादर केलेली ” सावित्री,” कविता ही स्त्री जीवनाची कथा,व्यथा आणि महत्ता सांगणारी होती. सावित्रीने सत्यवानाची पूजा करण्याऐवजी सत्यवानाने सावित्रीला पुजणे जास्त संयुक्तिक आहे.या आशयाच्या त्यांच्या कवितेला परीक्षकांसह उपस्थितानीही दाद दिली. स्पर्धेत सातारा,जळगाव, जालना,नगर,पुणे,नाशिक, पालघर,ठाणे आदी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.पालघर जिल्हा साहित्य क्षेत्रासह विविध स्तरातून पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

