वसंत भोईर,वाडा,
वाडा येथे मधमाशांचा हल्ला : अनेक नागरिक किरकोळ जखमी,
तालुक्यातील तिळसेश्वर येथे आज सकाळी दशक्रिया विधी कार्यक्रम सुरू असताना मधमाशानी अचानकपणे हल्ला केल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात भटजी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतल्याने नागरिकांची पळापळ झाली.
हाती आलेल्या वृत्तानुसार, तालुक्यातील भावेघर येथे एक व्यक्ती मयत झाल्याने त्यांचा दशक्रिया विधी आज तिळसेश्वर येथे होता.दशक्रीया विधी कार्यक्रम सुरू असतानाच जवळच असलेला मधमाशांचा पोळा उठल्यामुळे मधमाशांचा हैदोस सुरु झाला.पिसाळसलेल्या मधमाश्यानी विधीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना चावा घेतला. भटजींचा कडकडून चावा घेतल्याने ते सैरभर पळू लागले.शेवटी भटजींनी नदीमध्ये उडी मारून पाण्यात काही काळ राहिले.भटजी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यातही असाच मधमाशांचा हल्ला झाल्याने दोन नागरिक जखमी झाले होते.वारंवार होणा-या या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

