वसंत भोईर,वाडा
वाड्यात उन्हाळी भातपिकाची शेती..
वाडा तालुक्यातील खैरे – पासोरीपाडा येथील शेतकरी अशोक कोंडू पाटील या शेतक-याने आपल्या ४ एकर जागेत उन्हाळी भातपिकाची शेती केली असून जया या भात वाणाची लागवड केली आहे.
उन्हाळी भातपीक शेती करण्याची ही माझी पहीलीच वेळ असून विंधन विहीरीच्या साहाय्याने पाणी देत आहे.या शेतीत विशेष नफा झाल्यास उन्हाळी शेतीमध्ये सातत्य कायम ठेवीन,असे त्यांचे म्हणणे आहे.
वाडा तालुक्यात भात हे प्रमुख कृषी उत्पादन आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा नसतानाही उन्हाळी हंगामात ही भातपीकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी अशोक पाटील यांनी भाताचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे.उन्हाळी भातशेती ही कष्टप्रद आणि त्रासाची असते.या सबबीखाली येथील शेतकरी शेती करण्याचे टाळत असतात.त्यामुळे गावातील पडीक क्षेत्रात वाढ झाली आहे.मात्र काही गावांतील शेतकरी मात्र धाडसाने उन्हाळी भातपीकाची शेती करुन नवा आदर्श समाजासमोर ठेवत आहेत.
यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भात पीकाचे होत्याचे नव्हते केले आहे.ऐन पीक तयार होण्याच्या काळात पाऊस पडल्यामुळे भात पीकाचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लागवडीचा खर्चही निघाला नाही.पीक कर्ज कसे फेडायचे अशा चिंतेत असतानाच काही शेतकरी उन्हाळी भातशेती करत आहेत .
उन्हाळी हंगामातील भातपिकाची उंची ही पावसाळी पिकापेक्षा कमी असते.तसेच पावसाळी भातपीकापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते.भाताचे उत्पादन उन्हाळी हंगामात चांगले येईल,अशी अपेक्षा शेतकऱी अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

