मनिष म्हात्रे,वसई,
केसरीभाऊंचा अनंताचा प्रवास,वृद्धापकाळाने दु:खद निधन,
पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मानबिंदू , पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ४० वर्षे ” केसरी, ” ची यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या ” केसरी, ” टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे मुंबई वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते. वयाच्या ५० वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना करून खुप कष्टाने जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास उदयास आणली.त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे.त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदये जिंकली आहेत.
केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचा जन्म १० एप्रिल १९३५ रोजी मथाणे या गावी झाला होता.शेतकरी, शिक्षक, टूर गाईड,उद्योजक,ते करोडपती असा केसरीभाऊंचा आयुष्याचा प्रवास झाला.भाऊंची सुरुवात अगदी साधी होती.महाराष्ट्रातील आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळील एका दुर्गम गावात शेतकरी कुटुंबातून आले होते.त्यांच्या शाळेत शिक्षण फक्त सातवीपर्यंतच होते त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना वसईला जावे लागले.
त्यानंतर, १९५५ मध्ये, त्यांनी शेतीमध्ये डिप्लोमा करण्यासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे आले.एका वर्षानंतर,२१ वर्षांच्या वयात,त्यांना त्याच जिल्ह्यातील हायस्कूलमध्ये कृषी शिक्षकाची पहिली नोकरी मिळाली.त्यावेळी त्यांचा पगार ? दरमहा ८५ रु.इतका होता.यासोबत, त्यांना कुटुंबाची शेती सांभाळावी लागली,जी दूरवर असल्यामुळे आव्हानात्मक ठरली.सफाळे येथील विद्याभवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली.जरी त्यांना पगारवाढ मिळाली नाही,तरी त्यांच्या वडिलोपार्जित घराजवळ जाण्यासाठी ती एक छोटीशी किंमत होती.येथे ते शेती तसेच इतिहास,भूगोल आणि हिंदीसारखे इतर विषय शिकवत असे. पुण्यातील एसपी कॉलेजमधून डिप्लोमा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अभ्यासात शारीरिक शिक्षणाचा समावेश केला.या शाळेत,त्यांचा मासिक पगार तिप्पट होऊन ८५ रु.वरून २८० रु.झाला होता.
पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ४० हून अधिक वर्षे ‘केसरी’ची यशस्वी वाटचाल आजही सुरू आहे. आज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेमध्ये १ हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.या कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल ५०० कोटींपेक्षा अधिक आहे.केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेने १३ लाखाहून अधिक लोकांना त्यांनी सहल घडवून आणली आहे.
८ जून १९८४ साली केसरी पाटील यांनी १०० चौरस फूट जागेत फक्त त्यांची पत्नी,मुले व एक कारकून, टंकलेखनिकाच्या सहकार्याने केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स,या सहल कंपनीची स्थापना केली. आपले ध्येय आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांचे स्थापनेपासून बहुमोल सहकार्य लाभले.त्यांच्यातर्फे मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजित केल्या जातात.केसरी टूर्सची पहिली सहल राजस्थानला गेली होती. ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत.केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील व झेलम चौबळ,या त्यांच्या कन्या होत.२०१३ मध्ये केसरी टूर्स मधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपली कंपनी वीणा वर्ल्ड स्थापन केली.केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला ISO 9001-2000 आणि OHSAS18000-2007 ही प्रमाणपत्रे मिळाली होती.ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळवणारी केरारी ही जगातील पहीलीच पर्यटन कंपनी होती.
केसरी पाटील यांना ट्रॅव्हल एक्प्रेसचा जीवनगौरव पुरस्कार,श्री जीवनगौरव पुरस्कार,उद्योग श्री पुरस्कार, मराठी व्यापारी मित्रमंडळ, पर्यटन उद्योग विकसन पुरस्कार,मोस्ट अग्रेसिव्ह मार्कटिंग अवॉर्ड प्रदान व आय आय टी सी कडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार,’बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


