जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे भारती विद्यापीठ शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न,
जव्हार भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सांस्कृतिक कार्यक्रमात नारीशक्तीच्या दुर्दम्य ध्येयाला निश्चय वृत्तीला आणि त्यागाला सलाम करण्यासाठी ” तमसो मा ज्योतिर्गमय,” या प्रार्थनेच्या ओळींतून पूर्ण शाळेचा कार्यक्रमाचे स्वरूप तयार करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस नववीच्या विद्यार्थिनींनी भारती विद्यापीठ गीत म्हटले. तर सिनियर केजीच्या गार्गी गायकवाड या लहानशा विद्यार्थिनीने पाहुण्यांसाठी सुंदर स्वागत गीत सादर केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जव्हार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे,शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती जव्हारचे अधिकारी उपस्थित होते.भारती विद्यापीठ संकुलातील तीनही शाखांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.तसेच गेल्या वर्षी दहावीत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या ध्येय धोरणावर वाटचाल करीत व डॉ. पतंगरावजी कदम यांचे पुण्य स्मरण करून त्यांना आदरांजली देत त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.दीपप्रज्वलनानंतर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनकुमार राठोड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये जे उपक्रम घेण्यात आले,त्याचे अहवाल वाचन शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर सर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.
त्यानंतर ज्युनियर के.जी. च्या स्वागत गीताने आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये ज्युनी.के. जी.व सिनिअर के.जी.आणि इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.महिला शक्तीला सलाम करण्याकरिता या कार्यक्रमात नारीशक्तीवर, नारीवर होणारे अत्याचार, आजच्या युगातील नारी व देशामध्ये महिलांनी मिळविलेले आजचे बहुमूल्य स्थान,अशी महिलांची विविध रूपे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. तसेच अनेक राज्यांची सांस्कृतिक नृत्ये व वेस्टर्न डान्स सुद्धा सादर करण्यात आले.विशेष म्हणजे कार्यक्रमातील नृत्यदिग्दर्शनाचे काम हे वर्गशिक्षकांनी केले होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे, वैशाली जाधव,फिरदोस लूलानिया व नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात १० वीच्या विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक केला तर शेवट नारी आदिशक्तीच्या गोंधळाने झाला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश मुकणे (कला शिक्षक) व प्रणाली मुकणे यांच्या उत्तम नियोजनामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या यशानंतर मुख्याध्यापक राठोड यांनी सांस्कृतिक विभागाचे,सहशिक्षक कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाची सांगता दहावीच्या कुमार विपुल बावस्कर या विद्यार्थ्याने करून आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.

