सुगंध जुन्नरकर,वाणगाव
परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडाव्यात – पालकमंत्री गणेश नाईक,
मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत,१२ वी व १० वी परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पालघर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आवाहन करीत आहे,असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त,आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे,यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा.शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून,ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडवण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल, यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्याची मानसिक तयारी करावी,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
तसेच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील,यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे.परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत असून महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊया,असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

