अभय घोरपडे,अलिबाग,
रायगड जिल्हा पालकमंत्रीपद : राष्ट्रवादी व शिवसेना वाद चिघळणार….
राज्यातील नाशिक आणि रायगड,या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.आज रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीवरून राष्ट्रवादी व शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळून वर आला आहे.या घडामोडीवरून महायुतीत पुन्हा धुसफूस सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे.अशात आज शिवसेनेच्या आमदारां शिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्यामुळे चांगलीच ठिणगी पडली आहे.रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पध्दतीने या बैठकीला उपस्थित होते,भरत गोगावले रायगडमध्येच आहेत,महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदे यांचे आमदार देखील रायगडमध्ये असल्याची माहिती आहे.त्यामुळे एकनाथ शिंदें गटाच्या आमदाराशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली.त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.या बैठकीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं आ.महेंद्र दळवी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली.या बैठकीला अदिती तटकरे यांनी हजेरी लावली होती.तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.या बैठकीला शिवसेनेचे तीनही आमदार गैरहजर राहिल्यामुळे पालकमंत्री पदावरून पुन्हा तिढा निर्माण झाला आहे का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी एकनाथ शिंदे उपस्थित होते.
या बैठकीबाबत शिवसेना आ. महेंद्र दळवी यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी या बैठकीबाबत माहिती नसल्याचं सांगितलं.अजित दादांच्या दालनामध्ये बैठकीसाठी आदिती तटकरे उपस्थित होत्या.अधिकारी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते, अजित दादांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक पार पडल्याचे आम्हाला माहिती आहे,मीटिंग ठरली होती तर त्यांनी आम्हाला तसं निमंत्रण द्यायला हवं होते.तसं काहीच झालं नाही.जिल्ह्याची आढावा बैठक असेल तर आम्हाला का बोलवलं नाही.आम्हाला या बैठकीबद्दल काहीच माहित नव्हते. आम्हाला पालकमंत्री पदापासून दूर ठेवून,असे निर्णय घेणे योग्य नाही,असे आमचे म्हणणे आहे.
पालकमंत्रीपदाबाबत बोलताना महेंद्र दळवी म्हणाले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमचे सविस्तर बोलणे झाले आहे.पालकमंत्रीपदासाठी आमची आग्रही मागणी आहे, आम्हाला पालकमंत्रीपद मिळालंच पाहिजे,अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे.त्याचबरोबर प्रोटोकॉल नुसार पालकमंत्रीपद हा आमचा हक्क आहे.येत्या दोन दिवसात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेऊन आम्हाला निश्चित न्याय देतील,असं मला वाटतं.आम्ही आजच्या झालेल्या बैठकीबाबत एकनाथ शिंदे यांचे चर्चा करू. या बैठकीचा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत, आम्हाला का बोलावलं गेलं नाही,याबाबत आम्ही चर्चा करू,असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.
पालकंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाते.जिल्ह्याचं वर्षभराचं नियोजन करण्यासाठी ही बैठक असते.,शिंदे गटाचे आमदार ऑनलाईन उपस्थित राहणं अपेक्षित होतं,मात्र ते उपस्थित नव्हते,त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे.दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं. त्यामुळे जिल्ह्यात नाराजी पसरली होती.शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली.शिवसेनेचे जिल्ह्यातील तिनही आमदार तटकरे यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. इतरही आमदारांंनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.या वादानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदी झालेल्या नियुक्तीला तातडीने स्थगिती देण्यात आली. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून हा वाद सोडवतील,असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं,मात्र अद्यापपर्यंत या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळू शकलेला नाही.अशातच ही बैठक पार पडल्याने पुन्हा आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.

