चेतन भालेकर,मुंबई,
राजकीय आखाडा,
राज्यात लवकरच नवीन राजकीय समीकरणे…
काल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज सकाळी शिवसेना उबाठा गटाचे सुभाष देसाई,अंबादास दानवे व मिलिंद नार्वेकर या तिघांनी सागर या फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.ही भेट कशासाठी होती,हे स्पष्ट होत नसले तरी राजकीय वर्तुळात वातावरण मात्र तापू लागले आहे.एकनाथ शिंदे गटाची नाराजी व होत असलेले असहकार्य,अशा दोन कारणामुळे महायुतीमध्ये सध्या अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आता शिंदे गटावर फारसे अवलंबून न राहता महायुतीची तटबंदी अधिक भक्कम करण्याच्या कामाला लागले आहेत.हिंदुत्वाचा पाया असलेल्या पक्षाची मोट बांधण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.राज ठाकरे यांची काल झालेली त्यांची भेट व उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांची सागरवर खलबते,हा त्याचाच एक भाग आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,हे आता देवेंद्र फडणवीस यांना टाळून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत असतात.विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले आहे.त्यामुळे राज्यात हिंदुत्वावर आधारीत राजकारणाला फडणवीस हवा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यात सध्या भाजप -१३३,शिवसेना ( शिंदे गट ) -५७,राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) -४१,असे २३१,असे महायुतीचे संख्याबळ आहे.विविध कारणामुळे नाराज असलेल्या शिंदे गटाने फारकत घेतली तरी महायुती सरकारकडे १७४ आमदार असतील.ही संख्या बहुमताच्या १४५ हुन अधिक असल्यामुळे फडणवीस सरकारला सध्या तरी धोका निर्माण होऊ शकत नाही.तसेच उद्धव ठाकरे यांचे २० आमदार आले तर शिंदे गट वगळून महायुतीचे संख्याबळ १९४ इतके होऊ शकते.त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता हिंदुत्वाची भरभक्कम तटबंदी उभारण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे.शिंदे हे एकनाथ खडसेसारखे डोईजड होता कामा नये,यासाठी फडणवीस सक्रिय झाले आहेत,अशी चर्चा मंत्रालयात व्हायला लागली आहे.

