वसंत भोईर,वाडा,
तीन एकर शेतीत तब्बल ११ हजार खरबूज रोपांची लागवड,
वाडा तालुक्यातील आंबिस्ते बुद्रूक येथील शेतकरी कल्पेश काळूराम पाटील यांनी आपल्या ३ एकर शेतीत तब्बल ११ हजार रोपांची लागवड केली असून त्यासाठी त्यांना २ लाख ५० हजार इतका खर्च अपेक्षित आहे.खर्च वजा जाऊन चांगले उत्पन्न मिळेल,अशी अपेक्षा शेतकरी पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आंबिस्ते बुद्रूक येथील शेतकरी कल्पेश पाटील,हे दोन एकर जागेत खरबूज फळाचे पीक घेत असून कुंदन व्हरायटीज वाणाची लागवड त्यांनी केली आहे.खरबूज पीक ६० ते ६५ दिवसात तयार होते.तयार झालेल्या खरबूज खरेदीसाठी शहरातून व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर येऊन खरेदी करतात.प्र.कि.३० ते ३५ रु.असा भाव मिळत असतो.माझे खरबूज पीक एक महीन्याच्या आसपास काढणीस येईल,असे शेतकरी पाटील यांनी सांगितले.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून पालघर जिल्ह्यात ओळख आहे.आता महागाई,मजुरांचा तुटवडा व निसर्गाचा लहरीपणा इ. कारणामुळे भातशेती आता न परवडणारा झाला आहे.त्यामुळे भातशेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी भाजीपाला लागवडीसह विविध फळांचे उत्पन्न घेतांना दिसत आहेत.पावसाळ्यातील भात पीक घेतल्यानंतर आपल्या जमिनीत मुबलक पाण्याच्या ठिकाणी विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करीत असतात.यातून त्यांना खर्च वगळून ठोस उत्पन्न मिळत असते.
खरबूजाच्या फळापासून ते त्याच्या बियांपर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात.जर खरबूज योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर ते शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते.त्याचा गर आणि बियांची पेस्ट बनवून फेसमास्क म्हणूनही त्याचा वापर करण्यात येतो.त्वचेशी संबंधित समस्या डाग व कोरड्या त्वचेची लक्षणे दूर करते.उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहारात या फळाचा समावेश करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. कारण हे पोटॅशियम समृद्ध फळ रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त सुरळीतपणे वाहण्यास मदत करते.त्यामुळे या खरबूज फळांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असते.

