अजित क्षीरसागर,ठाणे
आपत्ती व्यवस्थापन समिती ; एकनाथ शिंदे यांना डच्चू ,समर्थकांमध्ये संतापाची लाट,
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डच्चू देण्यात आल्यामुळे ठाण्यातील शिंदे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विद्यमान उपमुख्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काही काळ अबोला धरत महायुती सरकारच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर ठेवले होते.ते या काळात आपल्या मूळगावी दरे येथे विसावले होते.अनेक निरोप त्यांच्या निकटवर्तीयांतर्फे पाठवल्यानंतरही शिंदे यांची नाराजी कायम राहिली.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांचे पंख कापण्यास सुरुवात केली आहे.
स्वीय सचिव नियुक्ती,प्रत्येक विभागाच्या विकासकामांच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्याची सक्ती व मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये,असे आदेश फडणवीस यांनी जारी केल्यानंतर या दोघांमध्ये असलेला दुरावा अधिक रुंदावत गेला.दोन दिवसापूर्वी फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे गठीत केली,पण त्यामध्ये शिंदे यांना स्थान देण्यात आले नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार याना व शिंदे यांच्या सहकारी मंत्र्यांचा समावेश या समितीमध्ये असून शिंदे यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.या सर्व घडामोडीमुळे ठाण्यातील शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी हे वृत्त प्रसिद्ध
झाल्यामुळे ही आपल्या नेत्यावर एकप्रकारची आपत्ती कोसळली असल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.

