वसंत भोईर,वाडा
भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवींवर हद्दपारीची कारवाई,
तालुक्यातील पाहुणीपाडा येथील राहत असलेले व विविध गुन्ह्यांची नोंद असलेले भास्कर लडकू दळवी याला पालघर नाशिक व ठाणे या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.वाड्याचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डाॅ.संदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली आहॆ.प्रशासनाच्या या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भास्कर दळवी यांच्यावर खून,खूनाचा प्रयत्न,दरोडा, मारामारी,जुगार,बेकायदेशीर जमाव करून हिंसा घडवणे, नुकसान करणे,ऑर्म अँक्ट,शिवीगाळ,दमदाटी, मारामारी,शासकीय आदेशाचे जाणूनबुजून पालन न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्य़ात त्याला सजाही सुनावण्यात आली आहे.दळवी यांच्याकडून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिसरात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांकडे दाखल केला होता.पोलीस अधीक्षकांनी सदरचा प्रस्ताव मान्य करून उपविभागीय अधिका-यांकडे कारवाईसाठी पाठवला होता.
वाडा परिसरात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने वाडा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डाॅ संदिप चव्हाण यांनी भास्कर याला तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश ४ फेब्रु.२५ रोजी दिले होते.
भास्कर यास आदेश बजावण्यात आला असून अपिलात त्याला सुट दिली नाही व येत्या दहा दिवसात तो प्रतिबंधित परिसरात दिसला तर त्याच्यावर कारवाई करू अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली.

