मनिष धानू,डहाणू,
पहिल्याच कासा महोत्सवाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद,
पालघर जिल्ह्यात कृषी,फलोत्पादन व
आदिवासीच्या विविध संस्कृती,याचे यथार्थ दर्शन घडवणारे विविध महोत्सवाची मांदियाळी पाहायला मिळते.डहाणू,चिकू व त्यानंतर आता कासा महोत्सवाचा यामध्ये समावेश आहे.काल पहिल्या कासा महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.या कार्यक्रमास खासदार,आमदार,राजकीय नेते,वरिष्ठ पोलीस, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.काल पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.हा महोत्सव ९ फेब्रु.पर्यंत चालणार आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासा येथे यंदा पहिल्यांदाच कासा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक आदिवासी समाजाची कलाकृती व संस्कृतीचे दर्शन घडावे,त्यांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळावी,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन खा.डॉ.हेमंत सवरा, आ.राजेंद्र गावित,आ. विनोद निकोले,राजकीय नेते व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.या तीन दिवसांच्या पहिल्याच महोत्सवात लाखो रु.ची उलाढाल होईल,असा अंदाज आयोजकातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.काल पहिल्याच दिवशी पालघर जिल्ह्यातील हजारो पर्यटकांनी हजेरी लावून महोत्सवाचा आनंद लुटला.या महोत्सवात आदिवासी समाजाची वारली चित्रकला,खाद्यपदार्थ व तारपा व अन्य साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.पहिल्याच महोत्सवाला पर्यटकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे.ग्रामीण भागातील कला व संस्कृतीचे दर्शन बाह्यजगाला होण्यासाठी असे महोत्सव होणे गरजेचे आहे,अशी प्रतिक्रिया पालघर- टेंभोडे येथे राहणारे अनिकेत धुमाळ यांनी माध्यमाकडे व्यक्त केली.

