जव्हार प्रतिनिधी,
ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीच्या विकासकामांना वेग,
ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडीच्या लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.गावातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून गरदवाडी आंब्याचापाडा येथे नवीन अंगणवाडीच्या बांधकामास नुकतीच सुरुवात झाली.या अंगणवाडी बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत,ग्राम सदस्य शंकर इल्हात,सामाजिक कार्यकर्ते नामदेव खिरारी, नाकिब लुलानिया यांसह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या गरजेनुसार विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.गटार बांधणी,रस्त्यांचे काँक्रीटीकरण,डांबरीकरण रस्ते,बहुउद्देशीय सभागृह, नवीन अंगणवाडी बांधकाम,तलाठी कार्यालय उभारणी,तसेच शाळा आणि अंगणवाडींच्या दुरुस्तीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
सरपंच कल्पेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.त्यामुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होत असून, नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळत आहे.
नवीन अंगणवाडी बांधकामामुळे गावातील बालकांना योग्य पोषण आणि शिक्षणाची उत्तम सुविधा मिळणार आहे.तसेच मातांसाठीही आरोग्य आणि पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
या विकासकामांमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक करत,पुढील विकासकामांसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
यावेळी सरपंच कल्पेश राऊत यांनी सांगितले की, “ गावाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.गावातील पायाभूत सुविधा बळकट करणे,हा आमचा प्रमुख उद्देश असून, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
गावाच्या आणखी प्रगतीसाठी भविष्यात पाणीपुरवठा योजना, महिला बचतगटांसाठी सुविधा, युवकांसाठी रोजगारवृद्धी उपक्रम आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबवण्याचे नियोजन आहे.
ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनास सहकार्य केल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

