संदीप जाधव,बोईसर
कोट्यवधी रू.च्या रस्त्याच्या कामात अफरातफरी,स्थानिक ग्रामस्थामध्ये प्रचंड असंतोष,
नागझरी – मासवन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम कोट्यावधी रु.खर्च होत असले तरी त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नागरिक या रस्त्याच्या अपूर्ण कामासंदर्भात वारंवार तक्रारी करत असूनही संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
या रस्त्यावर आजवर अनेक अपघात होऊन तरुणांचे बळी गेले.पण गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयारसुतक नाही.काल निहे येथील एका तरुणाचा रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागझरी येथील लाईफ लाईन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
नागझरी-निहे येथे शिवसाई कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.मात्र,या कामात नियोजनाचा अभाव आहे. मोऱ्यांचे काम सुरू असताना पर्यायी रस्ता तयार करण्यात आला, पण त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नाहीत.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहॆ.काल झालेला अपघात हा अशाच कारणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्रानी केला आहॆ.
अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहॆ.जोपर्यंत या रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर केल्या जात नाहीत,तोपर्यंत नागझरी-मासवन रस्त्याचे काम पूर्णतः बंद करण्याचे ठरवले आहे.
रस्त्याचे काम करताना सुरक्षेचे सर्व निकष पाळले पाहिजेत, पण या कामात ठेकेदार मनमानीपणे करत आहे. रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रु.खर्च होत असुनही सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजीपणा का ? असा सवाल नागझरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत.
काल झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचाराचा खर्च अपघातास जबाबदार असलेल्या कंत्राटदाराने उचलावा,अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी,अशी नागरिकांची मागणी आहे.प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सुरक्षाविषयक त्रुटी दूर कराव्यात अन्यथा,नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

