पालघर प्रतिनिधी,
समाज कसा आहे,याविषयी शांतपणे संशोधन करायला हवं – डॉ.मिलिंद बोकील,
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि समाजशास्रज्ञ
डॉ. मिलिंद बोकील यांनी ” इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ,” या प्रा.प्रतिभा कणेकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उदगार काढले.
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन सोहोळा प्रसंगी ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले,प्रतिभाताई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण एका मराठीच्या प्राध्यापिकेने समाजशास्राच्या दुसर्या प्राध्यापिकेचे चरित्र लिहिणं,ही वेगळी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.निवृत्त झाल्यानंतर पाच-दहा वर्षांनी सुद्धा एखादं पुस्तक लिहिता येतं,हे प्रतिभार्ताइंनी दाखवून दिलं आहे.चरित्र लिखाण ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिभार्ताइंनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत इरावती कर्वेचा परिचय करून दिला आहे.इरावतीबाईने अत्यंत गुंतागुंतीचं समाजशास्र मांडलं आहे.त्याचा आवाका समजून घेऊन,तसेच त्या व्यक्ती म्हणून कशा होत्या हे समजून घेऊन हे अतिशय उत्कृष्ट असे हे चरित्र तयार झालं आहे.कारण ते मराठी भाषेच्या प्राध्यापिकेने लिहिलं आहे.समाजशास्रज्ञाने लिहिले असतं तर ते तेवढं चांगलं झालं नसतं.कारण मराठी भाषेत गोडवा आहे,आंतरिक शक्ती आहे,रसाळपण आहे. म्हणूनच हे चरित्र अतिशय सुंदर झालं आहे.रसाळपणा जरी असला तरी तथ्यांशी कोणतीही तडजोड केलेली नाही.बारकाईने तथ्य तपासून जे संदर्भ दिले आहेत,तेही अचूक आहेत.निवृत्तीनंतरही प्रतिभाताईने समाजाला दिलेली ही देणगी आपल्या कॉलेजसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
येथे येण्यामागे माझी दोन कारणे आहेत.त्यापैकी एक म्हणजे हा परिसर.पालघरशी मी गेल्या वीस वर्षांपासून जोडलो गेलो आहे.जयंतराव पाटील आणि मित्र रमाकांत यांच्या संपर्कातून अनेकदा मी या परिसरात आलो आहे.यापरिसरा बाबत काही लिखाण देखील मी केलं आहे.चिकूच्या लागवडीनंतर झालेल्या बदलावर किनार्यावरचा कल्पवृक्ष हा लेख लिहिला होता.आदिवासींची प्रगती स्थानिक संसाधन वापरून कशी केली जाते,त्यासाठी बुलेट ट्रेनसारखे महाकाय प्रकल्प राबवायची गरज नसते,हे या लेखातून मांडलं होतं.दुसरं कारण माझी गुरु परंपरा.माझे पीएचडीचे मार्गदर्शक त्रिविक्रम नारायण वाळुंजकर हे इरावती बाईंचे शिष्य होते.त्यामुळे इरावतीबाई माझ्या गुरुपरंपरेतील आहेत. वाळुंजकर हे इरावतीबाईंचे शिष्य असल्यानेच मी त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले होते. या गुरू परंपरेत समावेश व्हावा,ही माझी इच्छा होती. त्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते फलद्रुप सुद्धा झाले.त्यामुळे प्रतिभाताईंनी जे काम केलं ते एक प्रकारे आमच्या गुरूंचे कौतुक आहे,म्हणून त्या कर्तव्यापोटीच मी येथे आलो आहे.
इरावती कर्वे यांचे सामाजिक योगदान,या विषयावर मला आपणांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे.पण तेवढ्यापुरताच मी तो मर्यादीत ठेवणार नाही,कारण त्यातील बराचसा भाग या पुस्तकात आला आहे.
इरावती कर्वे भारतातील एक नामवंत समाजशास्रज्ञ किंवा मानवशास्रज्ञ होत्या. अशा फार कमी व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या समाजाबद्दल विचार आणि चिंतन केले आहे.समाज म्हणजे काय ? समाजातील आपण सर्व कोण आहोत ? समाज कसा झाला ? आणि आपण असे आहोत ते तसे का आहोत ? या एकाच प्रश्नाचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला होता.मराठी किंवा इतर विषय असतात,ते एखाद्या गोष्टीचे वर्णन करतात.परंतु शास्र हे त्यापुढे जाऊन त्याला का असा प्रश्न विचारतात.इरावती कर्वे यांच्या व्यक्तीमत्वामध्ये या दोन्ही गोष्टींचा संगम झाला होता.म्हणूनच समाजशास्राचे कोणी विद्यार्थी असतील,त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे. इरावतीबाईंनी आपल्या समाजाबद्दलचा काय सारांश काढला हे एका वाक्यात सांगायचं तर आपल्या समाजाला इरावतीबाईनी गोधडीची उपमा दिली आहे. गोधडी कशी असते,हे आपण सारे जाणतो.इरावतीबाईच्या समोर असा प्रश्न होता की समाजामध्ये निरनिराळे पंथ, जाती,भाषा,आचार-विचार यांच्याबद्दल विविधता आहे, भेद आहेत,उच्च निचता आहे. जीवनपध्दतीमध्ये फरक आहे. ही एवढी विविधता कशी झाली.याबद्दल त्यांच्या पूर्वीच्या समाजशास्रज्ञांनी विशेषत: परदेशी समाजशास्रज्ञांनी तुकडे जुळवून चित्र बनविण्याच्या जिगसॉ पझल या खेळाची उपमा दिली होती.पण या उपमेमध्ये काही प्रश्न निर्माण होतात.या खेळात सर्व तुकडे समपृष्ठभागावर असतात.एकाच पद्धतीचे असतात,फक्त त्यांचे आकार वेगवेगळे असतात.परंतु भारतीय समाजाचं तसं नाही आहॆ.तो एका पृष्ठभागावर नाही,विषमता मोठ्या प्रमाणावर आहे.म्हणून इरावतीबाईनी भारतीय समाज ही एक गोधडी आहे,अशी उपमा देत ते आपल्या संशोधनातून ते सिद्धही केले. यातील महत्वाचा प्रश्न असा होता की,जगात कुठेही न आढळणारे एवढे समूह,जाती भारतातच कसे निर्माण झाल्या.याबाबत काही समाजशास्रज्ञांमध्ये विविध मतप्रवाह होते.एकच मुळ समाजाचे तुकडे होऊन नंतर विविध जाती,पंथ निर्माण झाले,अशी एक चर्चा होती. मात्र इरावतीबाईंच्या मते निरनिराळे समूह तुकडे विविध काळात जुळून आल्यामुळे त्यांची मेळणी होऊन असा समाज तयार झाला आहे.म्हणूनच त्याला इरावतीबाईंनी समाजाला जी गोधडीची उपमा त्यांनी दिली आहे.ही उपमा एखादी स्रीच देऊ शकते.कारण विविध तुकडे एकमेकांत बसतात आणि काळाच्या ओघात सर्व रंग विरून एकाच रंगाची होऊन जातात.मात्र काही तुकड्यांचं अस्तित्वही कायम राहते.अशारितीने समाज समजून घेण्यात,इरावतीबाईंचं मोठं योगदान राहिलं आहे. इरावतीबाईनी हे जे काही लिहिलं,त्याला जवळपास ६०-७० वर्ष होऊन गेली.या मधल्या काळात नवीन काही संशोधन झालं आहे का याचा आढावा घेण्याचा मी येथे प्रयत्न करणार आहे.
इरावतीबाई ज्यावेळी संशोधन करत होत्या,त्यावेळी माणूस कसा दिसतो हे बघून त्याच्यावरून निष्कर्ष काढला जात असे.डोक्याची मापे घेऊन उंच माथ्याची लोकं रुंद मस्तकात कशी गेली,अशी चर्चा त्यावेळी असायची. मधल्या काळात दोन शास्रांमध्ये अक्षरश: क्रांती झाली.त्यापैकी एक क्रांती झाली जीवशास्रामध्ये,यामुळे पेशीचं पृथक्करण करणे शक्य झालं.डीएनए कसा बनला ? त्यामध्ये काय फरक झाले ? हे तपासणे पूर्वी अशक्य होतं. त्या प्रकारचे विज्ञान प्रगत झालेलं नव्हतं.पेशीशास्रामध्ये खूप प्रगती झाली.डीएनए संशोधन झालं.तसेच संगणकक्षेत्रात प्रगती झाली. त्यामुळे अनेक प्रकारच्या माहितीचे खूप वेगाने एकाच वेळी प्रोसेसिंग होणे शक्य झाले.त्यामुळे नवीन संशोधन करणे शक्य झालं.
भारतीय समाजशास्रातला गुंतागुंतीचा आणि अवघड मुद्दा म्हणजे जात.जो कालही,आजही आणि उद्याही राहणार आहे. फक्त भारतातच जात आहे. असं का ? असा प्रश्न पडायला हवा.समाजशास्रज्ञ त्याचा नेहमीच अंदाज घेत असतात. इरावतीबाईंच्या मते जातीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समूहात म्हणजेच जातीत लग्न होतात. जात व्यवस्थेचा हा मुलाधार आहे.लग्नामुळे सोयरिक जोडल्यावर नाती जोडली जातात आणि विस्तारित नातेसंबंधांची जात बनते.एका विशिष्ट गटातील लोकांची लग्न करत गेल्यामुळे आणि ते तसे ओळखले गेल्यामुळे जात निर्माण होते.
विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.विविधता मिटवून सर्व भारत एकच करण्याचा प्रयत्न केला तर ते इतिहासाच्या दृष्टीने विसंगत व भविष्यात अशक्यही आहे.कारण एका ठिकाणाहून अन्यत्र जाणं,एकमेकांची सरमिसळ करणं,हाच भारताचा स्वभाव आहे. भारतीय संस्कृती माहिती नसलेली लोकच तसा प्रयत्न करू पाहतात,असं म्हणावं लागेल.मराठी लोकांचा पिंड मूळ दक्षिणेशी जास्त जोडलेलं आहे.दक्षिणेचा अभिमान धरण्याऐवजी आपण उत्तरेचा अभिमान धरत असतो.उत्तर भारतातील पितृप्रधान परंपरेऐवजी दक्षिणेतील मातृप्रधान,ही महाराष्ट्राची परंपरा आहे.त्याचा अभिमान धरायला हवा,हे अनेक उदाहरणांसह इरावतीबाईनी स्पष्ट केले आहे.
याला जोडून मुद्दा येतो भाषेचा.युरोपमध्ये प्रत्येक देशाची एकच भाषा असताना भारतात दोन हजार भाषा कशा निर्माण झाल्या.एकाच भाषेतून अनेक भाषा निर्माण झाल्या,अशी माहिती सांगितली जाते.मात्र लोक सतत येत गेल्यामुळे भाषांची विविधता निर्माण झालेली आहे.हे विश्वनाथ खैरे या संशोधकांने दाखवून दिलं आहे की,मराठी भाषेचा सर्व ऐवज तामिळनाडूकडून आलेला आहे.कोणतीही भाषा संस्कृत पासून निर्माण झालेली नाही. ४०-५० हजार वर्षांच्या इतिहासात लोक जेथे राहिली, तेथे त्यांची भाषा विकसित झाली.संस्कृत भाषा ही मुद्दाम बनवलेली संस्कारीत भाषा आहे.काही लोकांना देवाशी संभाषण करायचं आहे म्हणून सर्वसामान्यांना कळणार नाही, अशाप्रकारची ही भाषा बनवली आहे,हे भाषिक सत्य आहे.मानवशास्रज्ञांच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे की आधी लोकं असतात,ते भाषा बोलतात,त्यांच्यातून पंडित तयार होतात आणि मग ते त्या भाषेचं व्याकरण बनवतात.नंतर प्रमाणभाषा तयार होते.मराठी भाषेत अनेक तमिळ,तेलुगु,फारसी शब्द आहेत.अनेक भाषा मिळून मराठी भाषा बनली आहे.त्यामुळे एकच भाषा असा दुराग्रह धरणे देशाच्या दृष्टीने चुकीचं आहे.भाषा भिन्न कुळातील नसतात,ही दिव्यदृष्टी इरावतीबाईनी दिली आहे.
आपल्या इतिहासावर पर्यावरणाचा परिणाम झाला आहे.स्थानिक पर्यावरणानुसार राहणीमान,खाद्य संस्कृती,वेश विकसित होत असतात,त्यातून समाज घडत असतो.म्हणून पर्यावरण लक्षात घेतलं नाही तर समाज कसा आहे,हे लक्षात येत नाही आणि कोणती आव्हाने आहेत हे देखील समजत नाही.सिंधू संस्कृतीबद्दल सांगताना त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला म्हणून ती नष्ट पावली असे सांगितले जाते.मात्र प्रत्यक्षातील संशोधनानुसार सिंधू संस्कृतीच्या पर्यावरणातील बदल इतके अवघड झाले की त्या प्रकारची जीवनपद्धती राखणे,त्यांना कठीण झाले आहॆ.सिंधू संस्कृतीमध्ये विटांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात आढळून येते.विटांच्या बाबतीत ही संस्कृती अक्षरश: पछाडलेली होती.विटांच्या निर्मितीसाठी अनेक शतके ते पर्यावरणाचा र्हास करत होते.त्याचा विपरीत परिणाम त्या भागावर झाला.पर्यावरणाची चक्र बिघडलं आणि ही संस्कृती लयास गेली.आपण आता पुन्हा तेच भोगायला लागलोय. त्यामुळे पर्यावरणीय परिणाम समाजावर होत असतो.
महाराष्ट्रीयन आणि पंजाबी लोकांमधील अंगकाठीमध्ये फरक हा देखील खाण्यापिण्यामुळे निर्माण झालेला आहे. वर्षानुवर्षे तांदुळ,ज्वारी, बाजरीसारख्या प्रथिनांची कमी असणारी तृणधान्य खात राहिलो,त्याचा हा परिणाम आहे.पुर्वीच्या काळात सुध्दा आपले आयुष्यमान ३०-३५ वर्षाच्या पुढे जात नव्हते. म्हणूनच पर्यावरणाचा परिणाम जात व्यवस्थेवर होत आला आहे.पर्यावरणीय बदलांमुळे परंपरागत व्यवसाय बदलल्याने नवीन भेद तयार झाले आहेत,याची जाणीव इरावती कर्वे यांना झाली होती,म्हणून गोधडीची उपमा देताना या गोधडीचे तुकडे होऊन ते दुसर्या गोधडीत जातात,तशी अवस्था समाजाची होत असते.याचे उदाहरण आपण कोरोना काळात पाहिले आहे. याकाळात पूर्ण जीवनचक्र बदलले आपण पाहिले आहे, म्हणून पर्यावरणाचा प्रभाव समजून घ्यायला हवा.
सारांश असा की प्रधान मुद्दा इरावतीबाईनी सांगितला आहे,तो असा की आपला समाज कसा आहे,याचं सतत संशोधन करताना तेसुद्धा वस्तुनिष्ठ अनाग्रही पद्धतीने आणि कोणताही अभिनवेश,अस्मिता,हट्ट न धरता शांतपणे करायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे स्रिया व मुलींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हायला हवं.कारण इरावती कर्वे नंतर मराठी स्री ही मानवशास्रज्ञ झाली नाही,हे महाराष्ट्राला नक्कीच भुषणावह नाही.गेल्या ७० वर्षात फक्त इरावतीबाई आणि दुर्गाबाई यांचंच नाव घेतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुला मुलींनी समाजाचं संशोधन करायला हवं.त्यातही मुलींनी अग्रहक्काने करायला हवं,कारण त्यांना मोठ्या तर्हेचा समाजाचा पोत दिसत असतो.इरावतीबाई सारख्यांकडून आपण हे शिकायला हवं की,एक विषय निवडून त्याचा सतत ध्यास घेऊन त्यामध्ये प्रगती करायला हवी.त्यासाठी महाराष्ट्र हा त्यासाठी आदर्श भाग आहे. सर्वप्रकारची विविधता महाराष्ट्रात आहे.मात्र त्यासाठी सततच्या संशोधनाने वेध घ्यायचं काम विद्यार्थ्यांनी करायला हवं.इरावतीबाईनी जे मांडलं आहे,ते तपासून त्यातील चुकीचं काही असेल ते खोडून काढून माझं नवीन मत मी मांडेन,असं विद्यार्थ्यांनी ठरवलं तर या सार्याचं सार्थक झालं,असं मला वाटतं.शेवटी इरावतीबाई नेहमी म्हणायच्या ते सांगून मी थांबतोय,त्या म्हणायच्या कोणीही आपलं नसतं,फक्त आपलं काम, हेच आपलं असतं.

