जव्हार प्रतिनिधी,
दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा “ बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्काराने गौरव.
दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या उत्कृष्ट बँकिंग सेवांच्या बळावर राष्ट्रीयस्तरावर मानाचा तुरा रोवला आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बँकेस प्रतिष्ठित ” बँको ब्लू रिबन २०२४,” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे लोणावळा परिसरातील ॲम्बी व्हॅली येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.बँकेचे चेअरमन निलेश ज.पाटील,व्हा.चेअरमन वैभव अभ्यंकर,संचालक हबीब अ. शेख,प्रवीण रा.मुकणे,ज्ञानेश्वर तु.मोरे,नरेंद्र र.प्रभू,नामदेव य. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बा.मुकणे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या ऐतिहासिक सोहळ्यास सहकार व बँकिंग क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर आणि भारतातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.विशेष म्हणजे,साधारणतः तीन महिन्यांपूर्वीच बँकेस दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड,मुंबई यांच्यातर्फे “ उत्कृष्ट सहकारी बँक,” पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मिळालेला ” बँको ब्लू रिबन २०२४,” हा राष्ट्रीय पुरस्कार बँकेच्या सातत्यपूर्ण यशाची आणि विश्वासार्हतेची साक्ष देणारा आहे.सन १९४५ मध्ये श्रीमंत यशवंतराव मुकणे, महाराजा,जव्हार संस्थान यांनी बँकेची स्थापना केली.सात दशकांहून अधिक काळ ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत बँकेने आपली सर्वदूर ओळख निर्माण केली आहे. ग्राहकहित साधणाऱ्या योजनांचा पाठपुरावा करत बँकेने प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण व्यवस्थापन टीमने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकांना उत्तम बँकिंग सेवा प्रदान केल्या आहेत.या यशामागे बँकेवर विश्वास ठेवणाऱ्या सभासद, ठेवीदार,हितचिंतक आणि ग्राहकवर्गाचे मोठे योगदान असून,बँकेतर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.भविष्यातही बँकेच्या वतीने ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत सहकाराच्या नव्या उंचीवर झेप घेण्याचा निर्धार करण्यात आला.

