अनिल वैद्य,नाशिक
आदिवासी भागाच्या विकासासाठी कौशल्य शिक्षण महत्वपूर्ण-
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
आदिवासी भागातील लोकांना समाजाच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी मोठया प्रमाणात कौशल्य शिक्षण महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित MUHS FIST-25 परिषदेस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर ( निवृत्त ) समवेत ” एम्स,” नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, MUHS FIST-25 परिषदेचे आयोजक डॉ.संजीव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले,आदिवासी भागात पायाभूत सुविधा पोहोचणे गरजेचे आहे.त्यासाठी कौशल्य शिक्षण,पारंपरिक उद्योगांना प्राधान्य,आरोग्य व आर्थिकदृष्टया सक्षम करणे गरजेचे आहे.बांबूपासून विविध वस्तु तयार करुन जागतिक बाजारपेठेत त्याची मागणी वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.बांबूपासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प आदिवासी भागात सुरु करण्यात येणार असून त्याव्दारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल,तसेच कच्चा मालाचा पुरवठा करण्यासाठी वाहतुकीवरील खर्चही कमी लागेल. सामाजिक आणि आर्थिक बाबींचे संतुलन सांभाळत आदिवासींना आवश्यक पायाभूत गोष्टी पुरवण्यसाठी सर्वांनी प्रयन्तशील राहावे. पर्यावरण संवर्धनाची गरज महत्वपूर्ण असून पर्यायी इंधन शोधणे आवश्यक आहे. बायोडिझेल ऐवजी सी.एन.जी.इथेनॉल, हायड्रोजन इंधनावर भर देणे गरजेचे आहे.बांबूपासूनही बायो-इथेनॉल प्रकारात इंधन निर्मिती करता येते,त्या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बांबूपासून फर्निचर निर्मिती करुन कला व उद्योगाचा प्राधान्य देता येईल,असे त्यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची ’ट्रायबल व्हिलेज’ ला भेट,
MUHS FIST-25 परिषदेच्या प्रारंभी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ” ट्रायबल व्हिलेज,” ला भेट दिली.आदिवासी भागातील लोकांनी बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती,पेंटींग व वनस्पतीपांसून तयार करण्यात आलेल्या औषधी विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.आदिवासी भागातील पारंपारिक कला व उद्योगांना चालना देण्यासाठी ” ट्रायबल व्हिलेज,” संकल्पना अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ” ट्रायबल व्हिलेज,” संकल्पनेची माहिती व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ.मनिषा कोठेकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरु यांच्या हस्ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,संशोधक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

