दीपक मोहिते,
आयुष्याचं चांगभलं,
मनाची शांतता कधी कधी नकोशी व्हावी,असं आपल्या आयुष्यात अनेकदा घडतं.मन शांत असलं की आयुष्याचं मुल्यमापन करण्यासाठी सवड मिळते.काही चांगल्या,काही वाईट,अशा अनेक आठवणींचं गाठोडं,आपल्यापाशी असतं.त्याची एक एक गाठ जस जशी सुटत जाते,तसा तसा ” जगण्याचा,” मांडलेला पसारा समोर अस्ताव्यस्त पसरत जातो.
जे जगलो ते आयुष्य हे शिस्तबद्ध असणं किती गरजेचं होतं,याचा हळुवार उलगडा होत जातो.भावनिक, शारीरिक,आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील संतुलनासाठी आपण काहीच केलं नाही,हे जाणवू लागतं.सारासार विचारांपासून फारकत घेत भावनेत ” वहावत,” जाणं,याला आपण अधिक प्राधान्य देत गेलो.हे आपल्या लक्षात येते,पण तेव्हा उशीर झालेला असतो आणि वेळ निघून गेलेली असते.भानावर येणे गरजेचं असतानाच आपण दुसऱ्या चुका करण्याच्या तयारीत असतो.दुसऱ्या व्यक्तीला पारखताना तो चांगला व सरळ मनाचा आहॆ.असा विश्वास टाकून मोकळे होतो आणि याच विश्वासाला तडा जातो व फळ म्हणून “अपेक्षाभंग,” ओंजळीत पडतो.
शेवटी आपल्या आयुष्याचं ” हे असं काय झालं ?” असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी माझ्या आयुष्याचं ” हे काय करून घेतलं,? ” अशी विचारणा स्वतःला केल्यास निदान केलेल्या चुका लक्षात तरी येतील.केलेल्या चुका सुधारण्यासाठी मिळालेली एक संधी समजून उर्वरित आयुष्य निदान डोळसपणे आपल्याला जगता येईल.

