मनिष म्हात्रे,वसई,
नालासोपारा शहराची स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे वाटचाल,
२०१९ मध्ये स्वच्छ भारत अभियानात पहिल्या तीन राज्यात महाराष्ट्राचे नाव होते.तर महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर वसई विरार महानगरपालिकेने बाजी मारली होती.मात्र सध्या या महानगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छ शहराकडुन अस्वच्छ शहराकडे वाटचाल सुरु आहे.पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून दररोज कचरा उचलला जात नसल्यामुळे जागोजागी कच-याचे ढिग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावरून येजा करणे जिकिरीचे झाले आहे.
नालासोपारा पुर्व नगिनदासपाडा येथे पालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण केलेल्या चौकात गांधीजींच्या तीन प्रसिद्ध माकडांची शिल्पे बसवण्यात आली आहेत.स्वच्छता विभागाकडून परीसरात कचराकुंड्या ठेवलेल्या नसल्यामुळे येथे नागरीकांकडून प्लॅस्टीक,चप्पल,बाटल्या तसेच इतर टाकाऊ कचरा बिनधास्तपणे उघड्यावर टाकला जात आहॆ.त्यामुळे या चौकाची अक्षरशा दुर्दशा झाली आहे.रोजच्या रोज कचरा उचलला जात नसल्यामुळे रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांमुळे हा कचरा सर्वत्र विखुरला जात असतो.सकाळच्या वेळी मॉर्निंग वाॕकला जाणा-या नागरीकांना या कच-यामुळे नाक मुठीत धरून चालावे लागते.स्वच्छ भारत अभियान किंवा इतर महत्वाचा दिवस असेल तेव्हाच शहर स्वच्छ करणार का ? असा सवाल आता नागरीक करीत आहेत.हा कचरा रोज उचलण्यात यावा,कचरा कुंड्या ठेवण्यात याव्या,तसेच कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात येऊ नये,म्हणून परीसरात कॕमेरे बसविण्यात यावेत,मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशा विविध मागण्या नागरीकांकडून करण्यात येत आहेत.

