मनिष धानू,डहाणू,
डहाणू फेस्टिवलला ५ लाख नागरिक भेट देतील – पालकमंत्री नाईक,
डहाणू महोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकानी या फेस्टिवलला भेट दिली होती.दुसऱ्या वर्षी ही संख्या दुपट्टीने वाढली होती.यावर्षी पाच लाख नागरिक,या महोत्सवामध्ये सहभागी होतील,असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला.
ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले,डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे.तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासच्या परिसराची ओळख ही चौथी मुंबई म्हणून होणार आहे.
डहाणू येथील सिव्यू पार्क,डहाणू-आगर रोड येथे डहाणू नगरपरिषद यांच्यातर्फे आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव ३.० उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास आ.विनोद निकोले,आ.राजेंद्र गावित, आ.हरिश्चंद्र भोये,डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,सहा.वनसंरक्षक प्रियांका पाटील,डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे देशाचे नाव उज्वल करणारे,असे बंदर होणार आहे.त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक चालना मिळणार आहे.तसेच या महोत्सवात विविध बचत गट व इतर असे एकूण २०० स्टॉल लावण्यात आले आहेत.इतर खाद्यपदार्थांचेही स्टॉल असल्याने पर्यटकांना मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. गेल्या महोत्सवात ३ लाख पर्यटकांनी भेट दिली होती.यावर्षी ही संख्या ५ लाखापर्यंत जाईल,याची मला खात्री आहे.
यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली.हा महोत्सव तीन दिवस चालणार असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.महोत्सवाचा स्थानिकांनी व इतर पर्यटकांनी भेट द्यावी,असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डहाणू नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे यांनी करून महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले.

