दीपक मोहिते,
४१ अनधिकृत इमारती : अनधिकृत बांधकामे करणारे व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा – आम आदमी पार्टी,
नालासोपारा पूर्व भागात ४१ अनधिकृत इमारती बांधून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या २०० कुटुंबाच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करा.तसेच या अनधिकृत इमारती उभारणारा समाजकंटक व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा,अशी मागणी आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहॆ.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नालासोपारा पूर्व आचोळे येथील ४१ इमारती तोडण्याची कारवाई,वसई विरार शहर महानगरपालिकेने सुरू केली आहे व ती ३१ जाने.२०२५ पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महानगरपालिकेने आपली यंत्रणा पूर्ण ताकदिनीशी वापरण्यास सुरुवात केली आहॆ.कोणतेही अनधिकृत बांधकाम तातडीने तोडली पाहिजेत,याविषयी दुमत नाही. पण अशाप्रकारे उभारण्यात येणारी बांधकामे ती सुरु असताना अधिकारी कारवाई का करत नाहीत,हा खरा प्रश्न आहॆ. मागील काळात वसई विरार महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात जवळपास ८०० हुन अधिक अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत.
त्यापैकी अनेक इमारती या शासकीय व आरक्षित जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत.त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आली.निष्पाप रहिवाशांनी या दस्ताऐवजावर विश्वास ठेवून या इमारतीमधील घरे घेतली.आज ते रहिवासी अडचणीत आले आहेत. इमारतीवर कारवाई करण्याच्या न्यायालयीन आदेशानंतर सुमारे २०० कुटुंबाचे संसार रस्त्यावर आले आहेत.
अशा प्रकरणात दोषी असलेले अनधिकृत बांधकाम व्यवसायिक व त्यांना संरक्षण देणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी व राजकीय नेते यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहॆ.या प्रकरणी सरकारने त्यांच्या मालकीच्या असलेल्या सर्व संपत्ती,मालमत्ता व जमीन ताब्यात घेणे,तसेच त्यांची बँकेचे खाती गोठवणे आवश्यक आहे.
कारण अशा इमारती उभारण्यात येत असताना संबंधित ज्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही,त्यांचीही मालमत्ता जप्त होणे आवश्यक आहे.
सीताराम गुप्ता या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकाने वरील इमारती बनावट दस्ताऐवज तयार करून बांधल्या आहेत.या कुटुंबाना तात्पुरती सोय म्हणून सरकारने विरार वसई परिसरात म्हाडाने बांधलेल्या अनेक निवासी इमारती बांधल्या आहेत व आजतागायत त्या इमारतीमधील घरांची विक्री झालेली नाही.
त्या इमारतीमधील रिकामी घरे ही त्या पीडित कुटुंबाना राहावयास द्यावीत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहॆ.

