दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका : पुढील सुनावणी २५ फेब्रू.रोजी,
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी पुढील महिन्याच्या २५ तारखेला होणार आहे.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे.कारण गेली चार वर्षे या निवडणुका रखडल्या आहेत.लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत.याविषयी दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.परंतु त्या दिवशीही पदरी निराशाच पडली.आता २५ फेब्रु.रोजी होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रु.रोजी ठेवण्यात येणार होती,परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुन्हा पुढे ढकलली गेली आहे.मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला आहे.राज्यसरकार व याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले की सर्वपक्षीय सहमती झाल्यामुळे राजकीय पक्षात ओबीसी आरक्षण प्रश्नी कोणतेही मतभेद नाहीत.त्यामुळे २५ फेब्रु.रोजी होणाऱ्या सूनावणीमध्ये प्रभागरचनेचा तिढा सुटेल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
२५ फेब्रु.रोजी निर्णय झाल्यास राज्यातील मुंबई, ठाणे,पुणे, पिंपरी-चिंचवडसह २७ महानगरपालिका,२५७ महापालिका,२६ जिल्हा परिषदा व २८९ पंचायत समित्या,सहकारी बँका व सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.योग्य निकाल लागल्यास या निवडणुका एप्रिल किंवा मे २०२५ मध्ये होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

