दिपक मोहिते,
मानवी जीवनाला धोका,
भूजलात नायट्रेटचे प्रमाण वाढले ; मानवी जीवनाला धोका,
केंद्रीय भूजल मंडळाने नुकताच वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल जाहीर केला आहे.या अहवालात देशातील ४४० जिल्ह्यात भुजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढले असल्याचे नमूद केले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा,बुलढाणा,अमरावती,नांदेड,बीड,जळगाव व यवतमाळ या सात जिल्ह्याचा समावेश आहे.सदर अहवालाची राज्यसरकारने गंभीर दखल घ्यावी,अशी पर्यावरण तज्ञानी मागणी केली आहे.
भुजलात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असणे,ही बाब गंभीर असून पर्यावरण व मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.नायट्रेट आधारीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर,हे महत्वाचे कारण यामागे असून बागायती क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम लहान मुलांवर होत असतो.मुलांमध्ये ” ब्ल्यू बेबी सिंड्रोम,” सारख्या समस्या उद्भवू शकतात.आपल्या राज्यातील सात जिल्ह्यात गोळा करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये ३५.७४ % नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे.राजस्थान, कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यात ४० % हुन अधिक नमुन्यामध्ये मर्यादेपेक्षा नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.ही बाब धोकादायक असून राज्यसरकारने या अहवालाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

