अनिल वैद्य,नाशिक,
सतीश आळेकर यांना जनस्थान २०२५ पुरस्कार जाहीर,
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा २०२५ सालचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आज या पुरस्काराची घोषणा झाली एक वर्ष आड दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी नाशिक येथे गुरुदक्षिणा हॉल येथे होणार आहे.एक लाख रु.रोख व सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले १९७२ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञानाची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन काळापासूनच आळेकर यांनी नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्यातील अभिनय कौशल्य लक्षात घेऊन दिग्दर्शक भालबा केळकर यांनी त्यांना प्रोग्रेसिव ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये त्यांना सामील होण्यासाठी आमंत्रित केले.आळेकर यांनी १९६९ मध्ये ” झुलता पूल,” ही पहिली एकांकिका लिहिली आणि दिग्दर्शित केली.ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या बरोबर प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये सुरू केलेल्या तरुण मंडळाचा ते एक भाग बनले होते.आळेकर यांनी गाजलेल्या घाशीराम कोतवाल,या नाटकाच्या दिग्दर्शनात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनाही मदत केली होती.त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३५ हून अधिक नाटके सादर केली.अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाची स्कूल ऑफ आर्ट्सने त्यांना २००३ मध्ये भारतीय रंगभूमीवरील अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आमंत्रित केले होते.जॉर्जिया विद्यापीठाच्या थिएटर अँड फिल्म स्टडी विभागाने त्यांना २००५ मध्ये त्यांच्या बेगम बर्वे,या नाटकाच्या इंग्रजी निर्मितीसाठी आमंत्रित केले होते.त्यांनी बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे येथे विज्ञानामध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम केले.तसेच ललित कला केंद्राचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. दरम्यान १९७३ पासून लिहिलेल्या काही नाटकांची नावे याप्रमाणे आहेत.मिकी आणि मेम साहेब १९७३, महानिर्वाण १९७४,महापूर १९७५,बेगम बर्वे १९७९, शनिवार रविवार १९८२, दुसरा सामना १९८७, अतिरेकी १९९०, याव्यतिरिक्त १९६९ मध्ये लिहिलेल्या मेमरीपासून ” भोजन एक झुलता पूल,” ” दार कोणी उघडत नाही,” ” बस स्टॉप,” यासारख्या अनेक एकांकिका देखील त्यांनी लिहिल्या आहेत.कविवर्य कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या साहित्यिकांना नाटककारांना योग्यता असून देखील काही तांत्रिक कारणामुळे ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकत नाही, अशा साहित्यिकांचा गौरव व्हावा,या उद्देशाने कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि एक वर्ष आड जनस्थान आणि गोदावरी गौरव हे पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली आहे.ही प्रथा करोना काळ वगळता अखंडितपणे सुरू आहे,अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी पुरस्कार निवड समिती सदस्य कुमार केतकर,
गणेश मतकरी,
विजय केंकरे व
गणेश कनाटे यांनी काम पाहिले.पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे पदाधिकारी वसंत आबाजी डहाके,संजय पाटील,सुरेश भटेवरा,ऍड.दत्तप्रसाद निकम,ऍड.राजेंद्र डोखळे, सिसीलिया कारव्हालो, प्रकाश वाजे,डॉ.दिलीप धोंडगे,विलास लोणारी, लोकेश शेवडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

