अनंत भोईर,पालघर,
उत्कृष्ठ काम करणाऱ्या कुटूंबाचा सत्कार,
स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.स्वच्छतेच्या सुविधांचा नियमित वापर व देखभाल करून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ करण्याच्या उद्देशाने “ स्वच्छ माझे आंगण,” अभियान जिल्ह्यातील ८९८ गावांमध्ये राबवण्यात आले.
यामध्ये वैयक्तिक शौचालय,शोषखड्डा अथवा परसबाग,कंपोस्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या वापर करणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांना उत्कृष्ट कुटुंब म्हणून प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सर्व गावांत दृश्यमान स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे आहे.याकरीता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी ” स्वच्छ माझे आंगण, ” अभियान राबवण्यात आले. या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी केले होते.
गावा-गावात स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) अंतर्गत स्वच्छतेच्या सुविधांचा वापर करण्यासाठी तसेच नागारिकांची वर्तणूक बदलासाठी जनजागृती करण्यात येते,असे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी यावेळी माध्यमाना सांगितले.

