दीपक मोहीते,
” न्यूजलाईन, ”
हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मिश्किलपणामध्ये खंत दडली आहे..
गरिबाला गरीब जिल्हा का
दिला ? असा सवाल उपस्थित करून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पदावरून मंत्र्यांमध्ये हाणामाऱ्या का होत आहेत,याचा उलगडा झाला आहे.मलईदार जिल्हा मिळाला नाही की पालकमंत्री नाराज होत असतात,हे पुन्हा झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.
चार दिवसापुर्वी आम्ही पालकमंत्रीपद हे जिल्ह्याच्या आर्थिक लुटीसाठी किती महत्वाचे असते,यावर आपल्या लेखातून प्रकाशझोत टाकला होता.त्यावर नरहरी झिरवळ यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.ज्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे.मुं
मुंबई,पुणे,बीड,सोलापूर,नाशिक,नागपूर,ठाणे या जिल्ह्यासारखे हिंगोली जिल्हा हा मलईदार जिल्ह्याच्या श्रेणीत नाही.या जिल्ह्यात फारशी विकासकामे करण्यात येत नाहीत,त्यामुळे आर्थिक निधीही अल्पप्रमाणात उपलब्ध होत असतो.त्यामुळे जी काही थोडीफार विकासकामे केली जातात,त्याची टक्केवारीही फार कमी प्रमाणात असते.तसेच स्थानिक आमदार,खासदार व अधिकारी या टक्केवारीत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या पदरात काय पडणार हो ? त्यामुळे या नवनिर्वाचित पालकमंत्र्यांनी थेट माध्यमांसमोर गरिबाला गरीब जिल्हा का दिला ? असा प्रश्न विचारला.त्यांनी हा प्रश्न मिश्कीलपणे विचारला,असे ते भासवत असले तरी या मिश्किलपणामध्ये खंत दडली आहे,हे मात्र खरं आहे.

