शुभम सावंत,विरार,
पाणीपुरवठा संदर्भात मनपा मुख्यालयात आढावा बैठक संपन्न,
वसई-विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय,विरार येथे राज्यस्तरीय आदिवासी आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा ),वसईचे माजी आ. विवेक भाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन, हर घर जल योजना, आणि अमृत योजनांच्या प्रलंबित कामांचा आढावा बैठक पार पडली .
या बैठकीत जलजीवन मिशनच्या विविध योजनांची अंमलबजावणी,प्रलंबित कामे, अडचणी आणि उपाययोजना, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.वसई तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असूनही,काही गावे आणि आदिवासी पाड्यांना आजही पिण्याचे पाणी मिळत नाही.तसेच वसई शहरांमधील सोसायट्यांनाही पुरेसे पाणी मिळत नाही.पाणीटंचाई भासत असून,सोसायट्यांना ट्रॅक्टरद्वारे पाणी आणण्यासाठी लाखो रु.ची बिले भरावी लागत आहेत.या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.याशिवाय, वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये अद्याप पाणी वितरणासाठी जलवाहिन्या अंथरण्यात आलेल्या नाहीत. याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारून काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कालावधी विचारण्यात आला. “ हर घर नल से जल,” या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश श्री. विवेक भाऊ पंडित यांनी दिले.
तसेच जलजीवन मिशनचे उद्दिष्ट प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांवर वेगवान अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आणि जल जीवन मिशनचे उद्दिष्ट प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्याचे सांगितले.तसेच नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा वेळेत आणि प्रभावीपणे करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला.
या बैठकीस वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, प्रकल्प अधिकारी डहाणू सत्यम गांधी,गट विकास अधिकारी वसई डोलारे,पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ ठाकरे जलजीवन मिशन अधिकारी,जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, तसेच वसई मतदारसंघातील भाजपचे प्रमुख प्रतिनिधी, कार्यकर्ते,श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

