सुलभा रानडे,रत्नागिरी,
मिरकरवाडा बंदरातील ३०० अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा,
जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर परिसरात फोफावलेल्या अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे.बंदराच्या विकासाच्या कामात अडथळा येऊ नये,यासाठी संबधित व्यक्तींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मिरकरवाडा बंदराच्या ११ हे.जमिनीवर कोट्यवधी रु.खर्च करून बंदर नव्याने विकसित करण्यात येत आहे.नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या सुसज्ज अशा या बंदरात ३०० ट्रॉलर्स व २०० पर्ससीन नौका,अशा एकूण ५०० नौका उभ्या राहू शकतील.या बंदराच्या विकासासाठी आर्थिक निधीही मंजूर करण्यात आला आहे.त्यासाठी आवश्यक ती जमीन मोकळी करून देणे आवश्यक आहे.सध्या या जमिनीवर ३०० हुन अधिक अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत.त्यामध्ये माशांची जाळी,नौकाचे सामान,सुकी मच्छी,तसेच माशांची खरेदी-विक्री केंद्र याचा त्यामध्ये समावेश आहे.ही अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत मत्स्यविभागाने अनेकदा नोटीसा बजावल्या,पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.ऑक्टो.२०२३ मध्ये ही बांधकामे हटवण्यात आली होती,मात्र कालांतराने ती पुन्हा उभारण्यात आली.बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्यात नौका दुरुस्ती,लिलावगृह,विश्रांतीगृह,रस्ते,उपहारगृह, सांडपाणी प्रक्रिया केंद्र,सुरक्षारक्षक चौकी,अशा अनेक कामाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा आता ऍक्शन मोडवर आली आहे.

