वाड्यातील शेतकऱ्यांच्या संसारात तिखट मिरचीने आणलाय गोडवा
बागूल कुटुंबीय घेतात १५ वर्षांपासून मिरची लागवडीतून ठोस उत्पन्न
वाडा तालुक्यातील कोंढले येथील शेतकरी संजय बाळकृष्ण बागूल यांनी आपल्या २ एकर जागेत तिखट मिरचीची लागवड केली आहॆ.खर्च वगळता चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी त्यात सातत्य राखले आहे.गेले १५ वर्षांपासून बागुल कुटुंबीय तिखट मिरचीची लागवड करीत आहेत.या तिखट मिरचीने शेतकरी संजय बागूल या शेतकऱ्याच्या संसारात गोडवा आणला असून एकरी एक ते दीड लाख रु.निव्वळ नफा मिळवत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाड्याचा तांदूळ हा ” वाडा कोलम,” या नावाने जगप्रसिद्ध आहे.असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबून आहे.तसेच मजुरांचा तुटवडा,खते,बी-बियाणे, औषधे यांची वाढती महागाई आदी बाबीमुळे भातशेतीचा व्यवसाय तोट्यात असून तो न परवडणारा असा आहे.त्यामुळे येथील अनेक शेतकरी हे पावसाळ्यात भात पीक घेतल्यानंतर आपल्या जमिनीत असलेल्या मुबलक पाण्याच्या उपलब्धतेवर विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करीत असतात.यातून त्यांना खर्च वगळून ठोस उत्पन्न मिळत असते.
तालुक्यातील कोंढले येथील संजय बागूल या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जागेत १२ हजार मिरचीची रोप लावली आहेत.यात महाजाॅला,९३०, इगल,ढोबळी व तिखट मिरची या वाणांची लागवड केली आहे.
यासाठी त्याला किमान ८० हजार रु. इतका खर्च अपेक्षित आहे.मीरची तयार झाली असून आठ दिवसा आड मिरचीचा तोडा केला जातो.वातावरणातील बदला नुसार जवळपास १० तोडे होत असतात.ही मिरची भिवंडी येथे बाजारात विक्रीसाठी नेली जात असून प्रति किलो ६० ते ६५ रु.भाव मिळत आहे.मिरची जरी आपल्या गुणधर्मानी तिखट असली तरी तीने अनेक शेतकऱ्यांच्या संसारात गोडवा आणलाय,हे ही तितकेच खरे आहे.
मिरची ही प्रत्येक ऋतूमध्ये मानवी आहारात वापरली जाणारी वस्तू असल्याने तीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.तसेच ती मानवी जीवनासाठी गुणकारी देखील आहे.मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमीन ए आणि सी हे आरोग्यासाठी लाभदायक आहेत.हिरवी मिरची कॅन्सर विरोधी गुणांनी समृद्ध आहे.ती रक्त पातळ करण्यास मदत करते.मिरची ही दैनंदिन आहारात असणे,आवश्यक आहे.त्यामुळे अनेक आजारापासून दुर राहण्यास मोठी मदत होत आहे.मिरची ही मानवी आहारातील अविभाज्य घटक असल्याने तीला बाजारात मोठी मागणी आहे.

