वसंत भोईर,वाडा,
ई-पिक पाणी न झाल्याने केंद्रावर भात घेण्यास नकार,
वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात बारा उताऱ्यावर ई-पीक पाणी,अशी नोंद न केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे भात आदिवासी विकास महामंडळाने घेण्यास नकार दिला आहॆ.ज्या शेतकऱ्यांनी केंद्रावर भात जमा केला आहे.तो भात परत घेऊन जाण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहॆ.भात पडून राहणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.या तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रांवर विविध वाणांची लागवड केली जाते.भात तयार झाल्यावर राज्य शासनातर्फे ई-पीक पाणी लावण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केले नाही.काही शेतकरी अशिक्षित असल्याने शेतावर जाऊन शेताचे फोटो काढणे,अँप डाऊनलोड करणे,रेंज नसणे,अशी ऑनलाईन प्रक्रिया करणे,हे जमत नसल्याने शेकडो शेतकरी ई-पीक पाणी पासून वंचित राहिले आहेत. आदिवासी विकास महामंडळातर्फे भात घेताना सातबारे उतारे देणे बंधनकारक असते आणि त्या सातबा-यावर ई-पीक पाणी अशी नोंद नसल्याने ते भात घ्यायला तयार नाहीत.तर काही केंद्रावर ई – पीक पाणी शिवाय भात घेण्यात आले आहे,तो भात पुन्हा घेऊन जाण्याचा तगादा केंद्र चालकांनी लावल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.केंद्रावर भात न घेतल्यास ते पडून राहणार असल्याने शेतकरी सध्या अडचणीत आला आहे.
यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता शासनाकडूनच आम्हाला परिपत्रक आल्याने ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केले नाही,अशा शेतकऱ्यांचे भात घेता येणार नसल्याची माहिती दिली.
दरम्यान,शेतकऱ्यांचे भात न घेतल्यास शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशारा काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी दिला आहे.

