शुभम सावंत,विरार,
मनपा मुख्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न,२६ जाने.पर्यंत प्रदर्शन खुले राहणार,
वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ” मी स्वच्छ अभियानामध्ये सहभागी होईन,आपले शहर स्वच्छ ठेवीन,” असे घोषवाक्य देण्यात आले होते.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन फित कापून केले आणि काढण्यात आलेल्या रांगोळ्यांची पाहणी केली. यावेळी समाजात सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्या होत्या.महाराष्ट्र राज्यात वाढती दहशत,महिलांवर वाढते अत्याचार, शहरातील दूषित प्रदूषण, झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल,पाण्याचा वाढता दुरुपयोग,वाढते आजार,शहरातील अस्वच्छ ठिकाणे,अशा रांगोळ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या होत्या.या रांगोळ्यांची पाहणी करण्यासाठी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार,पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे,व इतर कर्मचारी उपस्थित होते.
२६ जाने.२०२५ रोजी पर्यंत सदरचे भव्य रांगोळी प्रदर्शन खुले असून नागरिकांनी या भव्य रांगोळी प्रदर्शनास भेट देऊन या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे प्रेरणादायक योगदान पाहावे,असे आवाहन नानासाहेब कामठे,उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे मार्फत करण्यात येत आहे.

