नदीम शेख,पालघर,
उठाबशाच्या शिक्षेमुळे अत्यवस्थ झालेली विद्यार्थीनी रुग्णालयात दाखल,
शाळेत येण्यास पाच मिनिट उशीर झाला म्हणून मुख्याध्यापिकाने एका विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला आहे.
पालघरच्या भगिनी समाज शाळेतील ही घटना असून उठाबशा काढल्यामुळे विद्यार्थिनीला उलट्या मळमळ,पोटात दुखू लागल्याने दहावीत शिकणाऱ्या द्विता विनोद पाटील या विद्यार्थिनीला पालघरच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
पालघर शहरातील भगिनी समाज विद्यालयातील दहावी इयत्तेत शिकणारी पालघर ( टेंभोडे ) येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीला दोन दिवसापूर्वी सकाळी शाळेत येण्यास विलंब झाला.त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढल्यानंतर त्या मुलीच्या पायात व मांड्यांमध्ये गोळे आले व पोटदुखीचा त्रास सुरू झाला.त्यानंतर काही वेळाने उलटीच झाल्याने या विद्यार्थिनीला पालघर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घडलेल्या प्रकाराबाबत मुलीच्या पालकांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.मात्र हे प्रकरण सामोपचाराने मिटले.अशा प्रकारचे अघोरी कृत्य पुन्हा होणार नाही,याची काळजी घेण्यात यावी,अशी सक्त ताकीद पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना दिली.

