वसंत भोईर,वाडा,
वाड्यातून अनेक दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान,
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा निमित्त २६ जाने.रोजी त्र्यंबकेश्वर येथे यात्रा आहे. त्यासाठी वाडा तालुक्यातून पायी दिंड्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने विविध ठिकाणांहून निघाल्या आहेत.
जगद्गुरू तुकोबाराय व ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामाचा जागर करत दिंड्या हळूहळू पुढे जात आहेत.तालुक्यातून निघालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.या दिंड्यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण झाले असून रस्ते भगवेमय झाले आहेत.
वाडा तालुक्यातील गुंज दिनकरपाडा,पळसपाडा,मेट, देवघर,नांदनी,अंभरभुई, लोहपे,खानिवली,आबिटघर, तिळसा,खरिवली तर भिवंडी तालुक्यातील
झिडके,सावरोली या भागातून पंधराहून अधिक दिंड्या निघाल्या आहेत.
कोंढले परिसरातील दिनकरपाडा व पळसपाडा या दिंडीमध्ये पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे.तालक्यातून १० हजारांच्या आसपास वारकरी निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रे निमित्ताने त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले आहेत.मुक्कामी कीर्तन-भजन,जागर करत दिवस-रात्र नामस्मरण करून या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत.यावर्षी तरुण-तरुणींचा दिंडीमध्ये वाढता सहभाग,हा भारतीय संस्कृती जोपासण्याचा चांगला संकेत आहे.
तरुण वर्ग भक्तिमार्गाला लागल्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून व्यसनापासून परावृत्त होईल, असे दिनकरपाडा व पळसपाडा (मोहोट्याचापाडा) (कोंढले) परिसराच्या दिंड्यांतील प्रमुख बळीराम भेरे,दिनेश पवार,भास्कर दुबेले,माधव चौधरी,अंकिता दुबेले,विठ्ठल भोईर,विलास विशे,वाल्मिक म्हसकर,विलास भेरे,सुनील वेखंडे,बबन आहेडा,अनंता मराडे यांनी सांगितले.
कोंढले परिसरातील निघालेल्या दिंडीमध्ये विशेष आकर्षण ठरले ते आळंदी येथील ब्रह्मदेव महाराज, मतकर महाराज,त्यांच्या भेटीसाठी तालुक्यातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती.
तालुक्यातून विविध ठिकाणांहून निघालेल्या दिंड्यांसाठी अल्पोपाहार, चहा-नाश्ता,जेवण व राहण्याची व्यवस्था भाविकांकडून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात येते.आठ दिवसांचा पायी प्रवास करीत या दिंड्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर यात्रेस २६ जाने. रोजी पोहोचणार आहेत.

