अजय दीक्षित,
” बुमरँग,”
अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस दोषी ; गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश,
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची हत्या ही एक फेक एन्काऊंटर असल्याचा ठपका या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने पाच पोलिसांवर ठपका ठेवला आहे.या अहवालामुळे राज्यसरकारचे गृहखाते व या प्रकरणातील पाच पोलीस अधिकारी आता अडचणीत आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन समितीने आज आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.या अहवालात समितीने पोलिसांच्या केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.
आरोपी अक्षय शिंदे याने बंदूक खेचल्याचा पोलिसांचा दावा समितीने खोडून काढला.जर अक्षय शिंदे यांनी बंदूक खेचली असेल तर बंदुकीवर त्याच्या हाताचे ठसे कसे नाहीत,पाच पोलीस असताना ते अक्षयला आवरू कसे शकले नाहीत.त्याला मुंब्रा पास रोडवर का नेण्यात आले,व अन्य दोन असे पाच प्रश्न उपस्थित करत समितीने पोलिसांच्या करवाईवर संशय व्यक्त करत,या पोलिसांवर राज्यसरकारने गुन्हे दाखल करावेत,अशी शिफारस केली आहे.समितीने मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे.या सर्व पोलिसांसह त्या शाळांचे विश्वस्त, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या,अक्षय शिंदे हा गुन्हेगार होता,पण त्याला योग्य ती शिक्षा देण्यासाठी आपली न्यायपालिका सक्षम असताना त्याची फेक एन्काऊंटरमध्ये हत्या करण्याचा अधिकार या पोलिसांना कोणी दिला ?त्यामुळे या प्रकरणी हे सारे दोषी आहेत,हे फेक एन्काऊंटर हे केवळ शाळेचे विश्वस्त व मुख्याध्यापक यांना वाचवण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा होत आहे.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करणाऱ्या न्यायालयीन चौकशी समितीच्या शिफारशीवरून या पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गृहविभाग या प्रकरणी काय कारवाई करते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

