वसंत भोईर,वाडा,
महागाईच्या तुलनेत मेहनताना कमी,तोही मिळेना वेळेवर…
शालेय पोषण आहार योजनेतील आहार शिजवून व वाटप करणा-या महिलांना मिळणारा मेहनताना व वस्तूंच्या खरेदीची रक्कम तुटपूंजी असून तीही वेळेवर देण्यात येत नसल्याने पोषण आहार वाटप करणा-या महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ऑक्टो.२०२४ पासून पोषण आहार वाटप मेहनताना महिलांना दिलेला नाही. केवळ एका मुलामागे २ रू.८० पैसे मिळणारा खर्च व दोन हजार पाचशे रू. शिजवून वाटप करण्याचा मेहनताना अशी तुटपूंजी रक्कम तीही वेळेवर देण्यात येत नाही.घरातून बाहेर पडणा-या मुलाच्या हातावर गरीब आई पण पाच रू.चे नाणे खाऊसाठी देते. मात्र शाळेत दिल्या जाणा-या अंडी,भाजीपाला,बिस्किट व अन्य वस्तू विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात देण्यात येतात.त्या वस्तूंची किंमत दिल्या जाणा-या खर्चापेक्षा कितीतरी अधिक असते.साधे अंडे घ्यायचे तर त्याची किंमत दुकानदार १० रू.आकारतो. १० बिस्किटांचा पुडा १० ते १५ रू.ला मिळतो. भाजीपाल्याचे भाव पाव किलो भाजीला ५० रू.मोजावे लागतात.त्या मानाने सरकारकडुन मिळणारा खर्च तुटपूंजा असून त्यासाठी शिक्षकांनाच पदरमोड करावी लागते.सामाजिक सेवा म्हणून आम्ही काही पैसै खिश्यातून पदरमोड करतो,असे एका मुख्याध्यापकाने सांगितले.
पोषण आहार साहित्य वेळेवर आले नाही तर गावातील धनिक व्यक्तीकडून अथवा बचतगटाकडून घेतले जाते.पोषण आहार शिजवणा-या महिला या गरीब व गरजू महिला असतात. येथील मेहनतान्यावर त्यांचे घर,मुलांचे शिक्षण चालते. याची दखल घेऊन त्यांना दरमहिना मेहनताना द्यावा व महागाईचा विचार करून मेहनताना खर्च व वस्तूंच्या खर्चाच्या रक्कमेत वाढ करण्यात यावी,असे शिक्षक व महिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

