मनिष म्हात्रे,वसई,
आगाशी येथे सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा,
सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ,आगाशीचा ४७ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल संध्याकाळी काशीदास घेलाभाई हायस्कूल आगाशी येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत,केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमवंशी क्षत्रिय संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी भूषवले.यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे, आकाशवाणीचे केंद्र संचालक भूपेंद्र मेस्त्री,वृत्तनिवेदक राजेश राऊत,पत्रकार मनिष म्हात्रे तसेच आगाशी व उंबरगोठण शाखेतील ज्येष्ठ समाज बांधव व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वर्धापनदिनाचे औचीत्य साधून मंडळाच्या ” अंकुर, ” या हस्तलिखिताचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाज हा झाई बोरीगाव ते मुंबई माहीम, पुण्या पर्यंत वसलेला आहे .या समाजाच्या ५२ शाखा असून वसई तालुक्यातील आगाशी व उंबरगोठण येथील दोन शाखा एकत्र येऊन २० नोव्हें.१९७७ रोजी सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीची स्थापना झाली होती.यंदा या मंडळाचे ४७ वे वर्ष आहे.या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सातत्याने राबवीले जात असतात.त्यात लहान मूलांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा म्हणून कला व क्रीडा स्पर्धा,क्रिकेटचे सामने,शैक्षणिक व धार्मिक स्थळदर्शन सहल,खाद्य महोत्सव तसेच महिलांसाठी महिला क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत असतात.तरुणांना फिटनेसचे महत्त्व कळावे,यासाठी सायकल स्पर्धांचे आयोजन, कॕरम स्पर्धा,किल्ल्यांची व अवकाशाची माहिती व्हावी, म्हणून किल्ले बांधणी स्पर्धा व आकाशदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जात असतं.
काल वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रिया सावंत यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,आज मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित केलेले अंकुर हस्तलिखित हे संस्काराचे अंकुर आहे.या हस्तलिखितात गाव,किल्ले, निसर्ग याचे चित्रण आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असत, पालकांनी त्यांचे वैशिष्ट्य ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.लहान मुले ही अंकुरासारखी असतात.त्यांना वाढू द्या,मोठ होऊ द्या आपले मूल जसे आहे तसे त्याला स्विकारायची तयारी ठेवा.आजचे युग हे कौशल्याचे आहे.मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा,जास्त आहारी जाऊ देऊ नका.त्यांना सोशल मिडीयावरील रील स्टारपेक्षा रियल स्टार बनवायला शिकवा,असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.त्याचप्रमाणे मोबाईलच्या इमोजीपेक्षा इमोशन महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी संवाद साधा,असे त्यांनी उपस्थित पालकांना सांगितले.
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अतिथी अशोक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले कि,आजचे युग स्पर्धेचे असून स्पर्धा करताना ती विचारांशी करावी,ती स्पर्धा जीवघेणी करू नका.घरातील वातावरण,हे चांगले भवितव्य घडवत असून पालकांनी मुलांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे,असे सांगितले.
सदर कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश राऊत,माजी उपाध्यक्ष
केतन म्हात्रे,उपाध्यक्षा राजश्री म्हात्रे,कार्यवाह नूतन कवळी , कार्यवाह वृशाली राऊत,खजीनदार धवल म्हात्रे , सुजाता कवळी,स्मिता वर्तक,संगीता म्हात्रे,श्रद्धा म्हात्रे,मनिष राऊत,सुहास पाटील,किरण वर्तक,पंकज चुरी,विहंग कवळी,सुनिल चुरी,चिन्मय पाटील,आशिष म्हात्रे प्रतिक म्हात्रे आदी उपस्थित होते.

