वसंत भोईर,वाडा,
वाड्यातील शेतकरी भागीदारी पद्धतीने घेतात,कलिंगड पिकाचे ठोस उत्पन्न,
वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी शेतीचे अर्थकारण हे कलिंगड पिकावर उभी राहत आली आहे.तालुक्यात डि प्लस झोन आल्यामुळे कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.तरुणांच्या हाताला काही प्रमाणात काम मिळू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र तालुक्यातील बहुतांशी कारखाने विविध कारणास्तव बंद अवस्थेत आहेत.तरुणांच्या हाताला फारसे काम नसल्याने ठोस उत्पन्नाचे साधन म्हणून पुन्हा कलिंगड पिकाची लागवड २ ते ३ शेतकरी एकत्र येऊन भागीदारी पद्धतीने करु लागले आहेत.
बेभरवशा हवामानामुळे शेतीपेक्षा नोकरीच बरी,असा पवित्रा येथील तरुणवर्गाकडून घेण्यात आला होता.परंतू आता काही प्रमाणात तालुक्यात पुन्हा शेतकरी हिवाळी पिकासाठी कलिंगडाकडे पाहू लागला आहे.त्यादृष्टीने काही ठिकाणी भागीदारीमध्ये कलिंगडाचे पीक घेण्यात येत आहे.आंबिस्ते (बुद्रुक) येथील संजय रामचंद्र पाटील या शेतकऱ्याने आपल्या ५ एकर जमिनीत २४ हजार कलिंगड रोपाची लागवड केली आहे.यासाठी त्यांना २ लाख रु.खर्च अपेक्षित आहे.संजय पाटील हे प्रगतशील शेतकरी असून ते कृषी क्षेत्राचे अनेक पुरस्कार त्याना प्राप्त आहेत.
वाडा तालुक्यात पुर्वी गावोगावी कलिंगडाचे पीक घेतले जात असे.शेतकरी भातकापणी झाली की काही दिवसांतच कलिंगड पिकाच्या लागवडीकडे वळायचा. त्यासाठी शेती मशागतीला सुरुवात करून मध्यम प्रकारच्या जमिनीवर कलिंगडचे पीक घेतले जात असे.सध्या तालुक्यात ठराविक भागात कलिंगडाचे पिक घेतले जात असल्याचे पाहायला मिळते.सध्या फारशी कलिंगड लागवड होतांना दिसत नाही.कलिंगड पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागते.अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव व निसर्गाच्या लहरीपणाची भिती सतावत असल्याचे संजय पाटील यांनी बोलतांना सांगितले.
वाड्यात आता सर्वत्र कारखान्यांचे जाळे पसरले असल्याने नैसर्गिक छोटे-मोठे पाण्याचे ओहळ व नाळे बंद झाले आहेत.कलिंगड पिकासाठी मुबलक पाणी अवश्यक असते.तसेच कारखान्यांमुळे येथील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा,खते, बी-बियाणे
यांची वाढती महागाई व प्रदूषण हे ही मुख्य कारण असल्याचे शेतकरी सांगत आहेत.अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांचा हिवाळी शेतीचा अर्थकणा समजला जाणारा कलिंगड पीक घेणे हे हळूहळू कमी होत गेल्याचे पाहायला मिळत आहॆ.

