दीपक मोहिते,
राजकीय विश्लेषण,
उद्धव ठाकरे यांची ” एकला चलो रे,” ची भूमिका किती लाभदायक ?
दिल्ली विधानसभांच्या निवडणूकांची पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहॆ. त्यामागोमाग शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला सोडचिट्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.मुंबई महानगर पालिका निवडणूकांत शिवसेना उद्धव ठाकरे गट एकटाच निवडणूका लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या पाच वर्षांत हा पहिलाच प्रसंग असावा,ज्यानुसार उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे.साल २०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला होता.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीतील मोठा पक्ष होता.पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची प्रचंड पीछेहाट झाली. त्यामुळे अनेक आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याविषयी जास्त खळखळ न करता त्यांच्या मागणीला एकप्रकारे मुकसंमती दिली. त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणूकीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे.
या महायुतीशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा आधार न घेता ” एकला चलो रे, ” का म्हणत आहेत ?
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यामुळेच काँग्रेसच्या आघाडीसोबत आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पवार मात्र मौन पाळून आहेत,त्यांच्या ” अळी मिळी गुपचिळी,” अशा वागण्यामुळे सध्या यांच्याबाबत दोन चर्चा सुरु आहेत.पहिली चर्चा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात.दुसरी ही चर्चा आहे की सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सोडून इतर नेते अजितदादा यांच्या गटात जाऊ शकतात.शरद पवार यांच्याकडे आठ खासदार आणि १० आमदार आहेत. शरद पवार यांच्याकडे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे दोनच ज्येष्ठ नेते आहेत.
जर शेवटच्या क्षणी पवार यांच्या पक्षात काही गडबड झाली तर याचे थेट नुकसान शिवसेनेवर ( उ बा ठा ) होणार आहे.त्यामुळे शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाकडे कोणताही पर्याय राहणार नाही.त्यामुळेच उद्धव ठाकरे आपली वेगळी चूल मांडण्याची तयारी चालवली आहॆ.
विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी ३० हून अधिक जागांचा तिढा कायम होता.या जागाचा तिढा न सुटण्यामागे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद कारणीभूत ठरला होता.त्याचा जबर फटका दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील कामगिरीवर झाला आणि काँग्रेसचा मजल केवळ १६ जागांपर्यंत सिमीत राहिला.पराभवानंतर शिवसेना उद्धव गटात अंबादास आणि संजय राऊत हे काँग्रेसवर निर्णय न घेण्याच्या धोरणावर सध्या आगपाखड करत आहेत.तर पराभवानंतर काँग्रेस महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी केली होती.परंतू त्याची अमलबजावणी झालेली नाही.
काँग्रेस पक्षात साफसफाई कधी होणार आणि नव्याने उमदीने पक्ष पुन्हा मैदानात केव्हा उतरणार ? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. उद्धव ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे फायदा तर झालाच नाही, उलट पक्षाची प्रचंड पीछेहाट झाली.लोकसभा निवडणूकीत सर्वाधिक जागांवर लढल्या नंतरही उद्धव ठाकरे यांचा पक्ष अपेक्षित जागा जिंकू शकला नाही.
मुंबई महानगरपालिकेवर साल १९९५ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे.शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांचा मोठा जनाधार अजूनही शिल्लक आहे.त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत ” कोणाचीही साथसंगत नको रे बाबा,अशी भूमिका घेतली आहॆ.गेल्यावेळी ठाकरे यांनी ८४ जागांवर विजय मिळाला होता.नगरसेवकांची संख्या २३६ इतकी आहे.येथे महापौर बनण्यासाठी ११९ जागा जिंकणे महत्वाचे आहॆ. त्यासाठी सर्वच्या सर्व जागा लढवण्याची गरज आहॆ.
उद्धव ठाकरे सर्व जागांवर जिंकून स्थानिक पातळीवर आपला पक्ष मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत.आघाडीत गेले राहिलो तर जागावाटप करावे लागले असते.तसं व्हायला नको,म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटप झाले तर ठाकरे यांच्या गटातील अनेक मजबूत दावेदार एकनाथ शिंदे यांच्या किंवा भाजपाच्या कळपात सामील होतील,अशी वाटल्यामुळे उद्धव ठाकरे आता स्वबळाची भाषा बोलू लागले आहेत.
शिवसेना सुरुवातीपासून मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करीत आली आहे.शिवसेनेचा मुंबई आणि कोकणात चांगला जनाधार आहे.महाविकास आघाडीत राहिल्यास हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर त्याना उघड भूमिका घेता येत नव्हते. अलिकडेच बाबरी विध्वस प्रकरणी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट शेअर केली होती.त्यावरुन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक समुदायाने नाराजी जाहीर केली होती. काँग्रेसपासून वेगळी वाट करुन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदूत्वाचे कार्ड खेळण्याच्या तयारीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यात राजकारणात ” केव्हा काय होऊ शकते,हे कोणी सांगू शकत नाही.ठाकरे यांची शिवसेना स्वतंत्र लढून भविष्यातील आपले उद्दिष्ट साध्य करु इच्छीत असेल. एकट्याने जर लढून शिवसेनाचा परफॉर्मेंन्स जर चांगला झाला तर बीएमसी वाचवण्यासाठी नव्याने पुन्हा ठाकरे यांची शिवसेना कोणत्याही पक्षा सोबत आघाडी किंवा युती करु शकते.
अलीकडे उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु आहे.दोनदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांची भेट झालेली आहे.
त्यामुळे येत्या दोन महिन्यात राज्याच्या राजकीय क्षितिजावर खूप काही उलथापालथी होण्याची शक्यता,सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहॆ.

