दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आपल्या गृहविभागाचा कारभार दिवसेंदिवस लयाला,
परवा मध्यरात्री सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात चोराने धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या हल्ल्यात सैफ अली खान,हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान त्याची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले आहे.या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.खंडणी उकळण्याच्या उद्देशाने या चोराने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.तसेच हा हल्लेखोर सिसीटीव्हीत कैद झाला आहे.त्यामुळे तो लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.
या घटनेने राज्यात आजच्या घडीला कोणीही सुरक्षित नाही,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.चार महिन्यांपूर्वी बदलापूर येथे लहान मुलीवर झालेला बलात्कार,आरोपीची झालेला फेक एन्काऊंटर,त्यानंतर सिनेअभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार,लगोलग झालेली माजी आ.बाबा सिद्दीकी याची हत्या,बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या,अशा एकामागोमाग घडलेली घटनांनी राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती किती ढासळली आहे,हे अधोरेखित होत आहे.१९८० च्या दशकात मुंबई शहरात गॅंगवॉर उफाळून वर आले होते.तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते उध्वस्त करण्यासाठी दमदार पावले उचलली होती.तत्कालीन आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी त्याकाळी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना थेट एन्काऊंटर करण्याचे फर्मान सोडले होते.त्यांच्या या आदेशानंतर अनेक गुंडांचा खात्मा झाला व मुंबई शहरातील गँगवार संपुष्टात आले होते.पण हल्लीच्या काळात आपल्या पोलीस यंत्रणेचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ लागल्यामुळे यंत्रणेची विश्वासार्हता पार लयाला गेली.त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत आहे.त्याकाळी विनायक वाकटकर,इसाक बागवान,मधुकर झेंडे,संजीव दयाल,हेमंत करकरे व अशोक कामटेसारखे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा गुंडांना धाक होता.पण आता गुंड पोलिसांना वरचढ होऊ लागले आहेत.बीडमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या हत्या,खंडणी वसुली,अपहरण आदी घटना लक्षात घेता आपल्या गृहविभागाचा कारभार किती लयाला गेला आहे,हे आपल्याला पावलोपावली अनुभवायला मिळत आहे.

